...तर दुसरे लग्न केलेली पत्नीही पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र; उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 07:30 AM2021-09-07T07:30:00+5:302021-09-07T07:30:02+5:30
Nagpur News हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम २४ अनुसार, वारसाहक्क लागू होण्याच्या तारखेपर्यंत पत्नीने दुसरे लग्न केले नसेल तर, ती पत्नी पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी एका प्रकरणात दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम २४ अनुसार, वारसाहक्क लागू होण्याच्या तारखेपर्यंत पत्नीने दुसरे लग्न केले नसेल तर, ती पत्नी पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी एका प्रकरणात दिला. (... so the second married wife also deserves a share of the first husband's wealth; High Court)
प्रकरणातील रेल्वे कर्मचारी अनिलचा १९ एप्रिल १९९१ रोजी अपघातात मृत्यू झाला. त्याच्या वारसाला रेल्वेकडून मिळणारी भरपाई लागू होती. त्यामुळे रेल्वेने अनिलची नॉमिनी या नात्याने त्याची पत्नी सुनंदाला ६५ हजार रुपये भरपाई अदा केली. तत्पूर्वी सुनंदाने मे १९९१ मध्ये दुसरे लग्न केले होते. त्यामुळे अनिलची आई जयवंताबाईने सुनंदा भरपाईसाठी पात्र नसल्याचा दावा करून कायदेशीर लढाईला सुरुवात केली. त्याकरिता तिने उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी तपासल्यानंतर सुनंदा व जयवंताबाई या दोघींनाही समान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरवले.
या प्रकरणाला हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम २४ लागू असून त्यानुसार, वारसाहक्क लागू होण्याच्या तारखेपर्यंत पत्नीने दुसरे लग्न केले नसेल तर, ती पहिल्या पतीच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र आहे. अनिलचा १९ एप्रिल १९९१ रोजी मृत्यू झाला होता. त्या तारखेला अनिलच्या संपत्तीवर वारसाहक्क लागू झाला. त्या वेळी सुनंदाने दुसरे लग्न केले नव्हते. त्यामुळे ती अनिलच्या संपत्तीचा वाटा मिळण्यास पात्र होती, असे न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले. याशिवाय, न्यायालयाने अनिलच्या संपत्तीत जयवंताबाईचाही वाटा असल्याचे नमूद करून तिला अर्धी रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरवले, तसेच तिला संबंधित रक्कम तीन महिन्यांमध्ये ६ टक्के व्याजासह परत देण्यात यावी, असे निर्देश सुनंदाला दिले.
...म्हणून कलम २४ लागू
कलम २४ ला हिंदू वारसाहक्क कायद्यातून ९ सप्टेंबर २००५ पासून वगळण्यात आले आहे. परंतु, हे प्रकरण त्यापूर्वीचे असल्यामुळे संबंधित पत्नीचा या कलमानुसार अधिकार निर्धारित करण्यात आला.