काही राज्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काही विमाने रद्द होऊ शकतात. लॉकडाऊनच्या पूर्वीही नागपूर विमानतळावरील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आणखी प्रवासी कमी झाल्यास विमाने रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाच्या पूर्वी नागपूर विमानतळावरून दररोज ९ हजार प्रवासी ये-जा करीत होते. कोरोनात विमानसेवा बंद होती. परंतु अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढली आणि फेब्रुवारीत प्रवाशांची संख्या ५५०० पर्यंत पोहोचली. मागील तीन दिवसांपासून ही संख्या ४ हजारावर आली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटकसह काही राज्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. सुत्रांनुसार सोमवारी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे. प्रवाशांची संख्या ३ हजारापेक्षा कमी झाल्यास विमाने रद्द करण्याचे प्रमाण वाढणार आहे.
टर्मिनलमध्ये नियमांचे पालन करावे
सध्या गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली येथून नागपूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. सध्या विमानांचे नियमित संचालन सुरु आहे. प्रवाशांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी डीजीसीएच्या वेबसाईटवर आरटीपीसीआर टेस्टबाबत चौकशी करावी.
- आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक