आशिष दुबे
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका नियमावर बोट ठेऊन तयार केल्या जाव्या, अशी अपेक्षा असली तरी प्रश्नपत्रिका तयार करणारे सेटर या योग्यतेचे आहेत का, याची विद्यापीठाला कल्पना नाही. तसे नसल्यास परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर भविष्यात त्यांची पदवी अवैध घोषित होण्याचा धोका आहे.
विद्यापीठाच्या नियमानुसार, प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अनुभवी शिक्षकांकडून केले जाते. एखाद्या विषयात अनुभवी शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित क्षेत्रातील किंवा विशेषज्ज्ञाला नियुक्त केले जाते. ही नियुक्ती करताना नियमांमधील पात्रता आणि अनुभव विचारात घेतला जातो. नियुक्त केलेल्या शिक्षकांकडून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. त्याच आधारावर परीक्षा होते. मात्र ऑनलाईन पद्धतीमध्ये या नियमांचे पालन होत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी दोन पद्धती तयार करण्यात आल्या आाहेत. यानुसार, परीक्षा विभागाकडून अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या विषयांची परीक्षा घेतली जाईल, तर कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या विषयांची परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांना दिली आहे.
नियमांचे सर्वात जास्त उल्लंघन महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या परीक्षांमध्ये असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रश्नपत्रिका नियमानुसार नसतात. पात्र व अनुभवी शिक्षकांखेरिज अन्य व्यक्तींकडून तयार केल्या जातात. प्रश्नपत्रिका बनविणाऱ्या शिक्षकांची यादी नियमानुसार विद्यापीठाकडून तयार केली जाते. मात्र ऑफलाईन परीक्षेत अशी यादी नाही.
...
जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची
विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची आहे. यामुळे अर्थातच प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी अनुभवी व्यक्तीकडे देण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.
...