नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डाॅलरची आणि जाेडून असलेल्या चाव्हार प्रकल्पात ५ अब्ज डाॅलरची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या तेलाच्या पाइपलाइनचे महत्त्व तालिबानवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला सावधपणे तालिबानबाबत भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा माेठे नुकसान हाेईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर तसेच विदर्भ गाैरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती व त्याचे भारतावर हाेणारे परिणाम’ विषयावर जतीन देसाई यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. ते म्हणाले, तालिबानींशी वाटाघाटी केल्या तरी आणि नाही केल्या तरी समस्या आहेच. भारताने सावधपणे तालिबानशी संवाद चालविला आहे; पण त्याची फलश्रुती काय निघेल, हे काळच सांगेल. पाकिस्तानसह सउदी अरब व इराणने तालिबानला मान्यता दिली आहे. चीन आणि रशियानेही समर्थनाची भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान हा कित्येक वर्षांपासून भारताचा मित्र राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आशियाई देशांनी भारताला अलिप्त पाडून महत्त्व कमी केले आहे. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र मानला जाताे; पण ११ ऑगस्टला रशियाने अफगाणिस्तानमध्ये तालिबानबाबत बाेलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भारताला निमंत्रण दिले नाही. हे भारतासाठी चांगले संकेत नाहीत, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.
तालिबानने कब्जा करताच भारताने घाईघाईत आपले दुतावास अफगाणिस्तानमधून बंद करणे चुकीचा निर्णय असल्याची टीका देसाई यांनी केली. एकतर सर्व भारतीय परत येईपर्यंत दूतावास बंद करायला नकाे. तेथील हालचालींकडे लक्ष ठेवून इतर देशांच्या भूमिका समजण्यासाठी दूतावास सुरू ठेवणे आवश्यक हाेते, असे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील महिला व नागरिकांना आश्रय घेण्यासाठी भारताएवढा याेग्य पर्याय नाही. तेथे अनेक संघटनांची माणसे आहेत, ज्यांना भारताने कायम मदत केली व तेही भारताबाबत सकारात्मक आहेत. अशांसाठी भारताने मदतीचे दरवाजे खुले करावे, अशी भावना देसाई यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही मनाेगत व्यक्त केले. यावेळी प्रेस क्लबचे प्रदीप मैत्र, विदर्भ गाैरव प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील, समीर सराफ आदी उपस्थित हाेते. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.