नागपूर: ई-चालानची कारवाई करताना स्वत:च्या मोबाइलचा वापर केल्यास ट्रॅफिक पोलिसावरच ही कारवाई बुमरँग होणार आहे. राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी तसे इशारा वजा सूचना देणारे पत्र राज्यातील सर्व पोलीस मुख्यालयांना पाठविले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात. अनेक वाहनचालक लायसेन्स किंवा गाडीची कागदपत्रेही नाही, असे सांगून कारवाईतून निसटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक पोलीस ई-चालान बनवितात. पुरावा म्हणून स्वत:च्या मोबाइलमधून त्या वाहनाचा अन् नंबरप्लेटचा फोटो घेतात. बरेचवेळा हा ‘डाटा’ त्या पोलिसाच्या मोबाइलमध्येच अनेक दिवस पडून असतो अन् नंतर सवडीनुसार तो डाटा ट्रॅफिकच्या सिस्टिममध्ये अपलोड केला जातो. त्याआधारे दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी संबंधित वाहनधारकाला नोटीस पाठविली जाते. मात्र, हा प्रकार त्रुटीयुक्त असल्यामुळे अनेकदा वाहन एकाचे अन् दंड दुसऱ्याला असे प्रकार घडतात. संबंध नसताना चालान (नोटीस) आल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. प्रत्येक शहरातून अशा तक्रारी वारंवार ट्रॅफिक मुख्यालयात येतात. काही जण वरिष्ठांकडेही पुराव्यासह तक्रारी करतात. मात्र, त्याचा फायदा होत नाही. चूक नसताना निरपराध वाहनधारकाला दंडाची रक्कम भरावी लागते.
काय आहे पत्रात?- हा प्रकार अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे गेला. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत राज्यातील पोलीस प्रमुखांना, वाहतूक शाखेच्या प्रमुखांना एक पत्र पाठविले. - त्यानुसार, यापुढे ट्रॅफिक पोलिसांनी ई-चालानच्या कारवाईसाठी स्वत:च्या मोबाइलचा वापर करू नये, त्याऐवजी चालान मशीनचा वापर करावा, अशी कडक सूचना या पत्रातून दिली. - याकडे दुर्लक्ष करून जो कुणी पोलीस स्वत:च्या मोबाइलमधून ई-चालानची कारवाई करेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
चालान मशीनमार्फतच - डीसीपी आवाड - या आदेशाची गंभीर दखल घेण्यात आली असून शहर वाहतूक शाखेचे पोलीस चालान मशीनच्या माध्यमातूनच ई-चालानची कारवाई करणार आहेत, अशी प्रतिक्रिया या संबंधाने वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. आमच्याकडे ३०० चालान मशिन्स असल्याचेही त्यांनी सांगितले.