वर्षा बाशू ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच फूट नऊ इंचाची टोलेजंग उंची. शेलटा कमनीय बांधा, काजूकतलीशी तुलना करावी अशी उजळती नितळ त्वचा. चेहऱ्यावर आत्मविश्वासक प्रेमळ हास्य, किंचित खर्जातला मधुर स्वर आणि वागण्याबोलण्यात कमालीची नजाकत... ही आहे पहिल्या मिस ट्रान्स इंडियाचा किताब अलीकडेच जिंकलेली, २५ वर्षांची वीणा शेंद्रे. म्हणजे छत्तीसगडच्या रायपूर येथील पूर्वाश्रमीचा विनय शेंद्रे. वीणा नागपुरात एका कार्यक्रमासाठी आली होती.विनय ते वीणा हा प्रवास जगातल्या बहुतांश ट्रान्सजेंडर्सचा होतो तसाच खडतर झाला. वीणा सहजगत्या आपल्या आयुष्याचा पट उलगडून दाखवू लागते. माझा जन्म एका मुलीच्या शरीरात झाला आहे असं मला नेहमी वाटायचं. खूप लाजाळू होते. संकोची होते. १२-१३ वर्षांची झाले तेव्हा थोडंफार जाणवू लागलं होतं की, मी मुलींसारखी आहे. त्यांच्यासोबत खेळणं, मस्ती करायला अधिक आवडायचं. मी घरच्यांना विचारलं, मला बहिणीचे लिपस्टिक, कॉस्मेटिक्स का आवडतात. त्यावेळी त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पुढं सतराव्या वर्षीही ती आवड ओसरली नव्हती. मात्र १९ व्या वर्षी मी आपल्या आईवडिलांना निग्रहाने सांगितलं, मी आता यापुढे एका मुलीसारखं जगू इच्छिते. मला तशा प्रकारचं आॅपरेशनही करायचं आहे. त्यांनी अर्थातच माझं हे म्हणणं धुडकावून लावलं. नाराज झाले. रागावले.काही काळानंतर त्यांना पुन्हा समजावले. पण त्यांच्यावर सामाजिक दडपण जास्त होते. दुसरीकडे माझी भावनिक कोंडी वाढत चालली होती. मला मोकळेपणाने स्त्री म्हणून जगायचं होतं. आमच्यातले अंतर वाढत चालले होते. घरात मला अपमानास्पद वागणूक मिळू लागली होती. शाळेत मला कुणीच मित्र वा मैत्रिणी नव्हते. ते मला त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नसायचे. खेळत नसायचे. माझ्यासोबत कुणी डबा खात नसे. एकदा असह्य होऊन हे सगळं मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना माझी तगमग जाणवली. त्यांचा विरोध मावळला व माझा स्वीकार केला. पुढे माझ्या लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी परवानगीही दिली आणि ते करताना मला पूर्णपणे साथही दिली. त्याच सुमारास आमच्या घरात एक लग्न होतं. त्यावेळी मी प्रथमच विनयऐवजी वीणा म्हणून त्यात सहभागी झाले. माझ्यासाठी ती एक टेस्ट होती. मला समाज स्वीकारतो की नाकारतो हे पहायचं होतं. घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी खूप आक्षेप घेतला. विरोध केला. त्यावेळी माझी आई, ऊर्मिला शेंद्रे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. आपल्याला समाजात असाच बदल घडून यायला हवा आहे.पुढे मी मॉडेलिंगच्या क्षेत्रात उतरले. अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले. मला सगळे ओळखू लागले होते. मुंबई, बेंगळुरू येथील रॅम्प वॉकमध्ये भाग घेतला. या सगळ्या बदलांमुळे माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, ब्युटिशियनचा कोर्स केला. मिस ट्रान्स इंडियासाठी अर्ज केला. हा अनुभवही खूप शिकवणारा ठरला.
छत्तीसगडप्रमाणे इतरही राज्यात सुरू व्हाव्यात योजनाखरंतर, आम्ही खूप काही करू शकतो, अगदी डॉक्टर वा इंजिनियरही बनू शकतो. फक्त घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे. ज्यांच्या घरात असं मूल आहे, तेथील पालकांना मी मनापासून सांगू इच्छिते, की तुमच्या मुलाला स्वीकारा. त्याला साथ द्या. तो त्याचं आयुष्य निश्चितच घडवू शकतो... छत्तीसगड राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्ससाठी अनेक उपक्रम व योजना सुरू केल्यात. त्याचा आम्ही लाभ घेत असतो. अशा योजना देशातील अन्य राज्यांमध्येही सुरू व्हाव्यात. राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात ट्रान्सजेंडर्स, गे अशा समलैंगिक नागरिकांना सामावून घेण्याच्या दिशेने आपला प्रवास व्हायला हवा.