कमल शर्मा
नागपूर : ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले आहे, त्यामुळे कमी दिवसाचे का असेना पण हिवाळी अधिवेशन नागपुरातच होईल असा दावा अधिकारीही करीत आहेत. दुसरीकडे आमदार निवास इमारतीच्या पहिल्या विंगला नवीन लूक देण्यासाठी सुरू असलेले बांधकाम निधीअभावी संथ झाले आहे तर इतर दोन विंगमध्ये कोरोना संक्रमितांना ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत अधिवेशन काळात आमदार कुठे राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये आमदार निवासाच्या विंग क्रमांक १ ला अत्याधुनिक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) ने तातडीने पाच कोटी रुपयाच्या कामांसाठी निविदा जारी केली. तीन कंत्राटदारांना काम सोपवण्यात आले. या अंतर्गत पीओपी, फर्निचर, पेंटिंग व शौचालयांना अत्याधुनिक करावयाचे हाेते. ऑक्टोबर २०२० मध्ये हे काम पूर्ण होणार होते. आता ऑक्टोबर २०२१ सुरू आहे. परंतु अजूनही १५ टक्के काम शिल्लक आहे. काेविड संक्रमणामुळे हा उशीर झाला. परंतु दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरू लागली आहे. तरीही कामाला गती आलेली नाही. कारण कंत्राटदारांचे बिल अडकून पडले आहे.
सूत्रानुसार ५ कोटीच्या कामांसाठी २ कोटीचा निधी देण्यात आला. सव्वा कोटीची बिले तयार आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नाही. उर्वरित १.७५ कोटीच्या कामांचे बिल तयार व्हायचे आहेत. दुसरीकडे कंत्राटदारांनी काम संथ ठेवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पैशाशिवाय काम कसे करणार. आता केवळ १५ टक्के काम शिल्लक राहिले आहे. पैसे मिळताच १५ दिवसात हे काम पूर्ण होईल.
कोविड केअर सेंटर १५ पर्यंत खाली व्हावे
सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून १५ ऑक्टोबरपर्यंत आमदार निवासाचे विंग क्रमांक २ व ३ त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. या दोन्ही विंगमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. पीडब्ल्यूडीचे म्हणणे आहे की, आमदार निवास आमदारांसाठी राहण्यायोग्य बनविण्यात येईल. यासाठी सर्वात अगोदर संपूर्ण इमारतीला सॅनिटाईज करून १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर रंगरंगोटी आदी कामे केली जातील.
निधीची कमतरता परंतु काम पूर्ण होणार
कोविड संक्रमण व निधी अभावी काम पूर्ण होऊ न शकले नाही, हे मान्य आहे. परंतु आता अधिक काम शिल्लक नाही. कंत्राटदारांशी चर्चा करून १५ दिवसात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता,पीडब्ल्यूडी