नागपूर : संतत्वाचा विचार महाराष्ट्रानेच प्रथम दिला असून, संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाईने पहिल्यांदा ताटीच्या अभंगांमधून संताची व्याख्या केली आहे. संताला कसे सामाजिक भान असले पाहिजे, हे मुक्ताबाईने सांगितले. संत साहित्यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्वरवादाकडे वळली आणि त्यामुळे सामाजिक मूल्यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
शनिवारी साहित्य विहारच्या वतीने आयोजित द्विदिवसीय राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन ईवा (इंडियन वॉटर वर्क्स) सभागृहात साहित्य, संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोरे बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. मनीषा यमसनवार, साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य विहार संस्थाध्यक्ष आशा पांडे, श्रीकांत गोडबोले, गायक दत्ता हरकरे उपस्थित होते. याप्रसंगी साहित्य विहारचा प्रतिष्ठेचा वार्षिक 'ज्ञानयोगी सन्मान' नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी पती डॉ. मधुकर आपटे यांच्यासोबत स्वीकारला.
संत साहित्याला जसे आध्यात्मिक पैलू आहे, तसेच त्याला भाषिक व सामाजिक पैलूदेखील आहेत. समाजातील स्त्रियांचा, वंचित घटकांचा उद्धार व्हावा, यासाठी संतांनी समाजाच्या भाषेत संत साहित्य निर्माण केले व समाजाचा उद्धार करण्याचे काम केले व समाजात वैचारिक परिवर्तन घडविल्याचे डॉ. सदानंद मोरे म्हणाले. याप्रसंगी लघुमाहितीपटाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. अदिती देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रगती वाघमारे यांनी संचालन केले, तर दत्ता हरकरे यांनी शारदा स्तवन सादर केले. सुजाता काळे यांनी आभार मानले.
..........