नागपूर : मागील अनेक वर्षांपासून नागपुरकरांना खासदार सांस्कृतिक महोत्सवातून विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळत आली आहे. लोकसभा निवडणूकांच्या अगोदरचा हा अखेरचा महोत्सव ठरणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे अचूक आयोजन व्हावे यावर भर देण्यात येत आहे. संघभूमी व दीक्षाभूमी अशा दोन्ही विचारधारांचा प्रवाह वाहत असलेल्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या आयोजनात ‘सोशल इंजिनिअरींग’ साधण्याचादेखील प्रयत्न होत आहे. त्यामुळेच एकीकडे संघप्रणित संस्कार भारतीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत असताना देशाला संविधान देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारिक महानाट्याचेदेखील आयोजन होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून २०१७ साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे आठवे पर्व आहे. यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत १२ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांसोबतच स्थानिक उदयोन्मुख कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात भक्ती व संस्कृतीचा जागर करणारे विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध जाती-पंथ, भाषांच्या नागरिकांना जोडून त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित संस्कार भारतीतर्फे प्रस्तुत महाराष्ट्र माझा या कार्यक्रमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक व लोकधारा दर्शविणारी नाट्य, नृत्य व संगीतमय प्रस्तुती होणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संविधान शिल्पकार या महानाट्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गजानन महाराजांचे शहरात मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. राष्ट्रसंतांच्या आयुष्यावर आधारित महानाट्य क्रांती नायक तसेच श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित भक्ती नाट्य गण गण गणात बोतेमधून हे अनुयायी या महोत्सवाशी जोडले जाणार आहेत.
- हिंदी भाषिकदेखील जुळणाररविवारी भोजपुरी गायिका अक्षरा सिंह हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर भोजपुरी भाषिक नागरिक आहेत व ते अनेक वर्षांपासून येथेच स्थायिक झाले आहेत. या माध्यमातून तेदेखील या महोत्सवाशी जुळले जाणार आहेत.
- नवमतदार, तरुणांचादेखील विचारआयोजनादरम्यान तरुणांना डोळ्यासमोर ठेवूनदेखील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सोशल माध्यमांवरील रील्सच्या जमान्यात सचेत-परंपरा हे तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच बेनी दया, श्रेया घोषाल, अदनान सामी, मिका सिंह या गायकांची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची तरुणाईमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.