नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेला चित्ररथाचा शनिवारी दीक्षाभूमीवर समारोप करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांंची १२५ वी जयंती असल्याने शासनाने हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. सर्व ग्रामपंचायत स्तरावर समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, स्वातंत्र, वैज्ञानिक जाणीव जागृती, जातीय दुर्भावनांचे उच्चाटन व अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सहिष्णुता या विषयावरील चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी कोंढाळी येथून या चित्ररथाला सुरुवात झाली. त्यानंतर हा चित्ररथ काटोल, कळमेश्वर, सावनेर, मनसर, रामटेक, कामठी, मौदा, कुही, उमरेड, आणि भिवापूर आदी तालुक्यांमध्ये फिरून शनिवारी शहरात दाखल झाला. या दरम्यान गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह विविध महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा रथ काही वेळ रविभवनातही थांबला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या रथाचे स्वागत केले. त्यानंतर दीक्षाभूमी येथे चित्ररथ पोहोचला. (प्रतिनिधी)
सामाजिक न्याय चित्ररथाचा दीक्षाभूमीवर समारोप
By admin | Published: March 06, 2016 2:48 AM