लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.श्री नवयुवक स्नेह मंडळ वाचनालय , महाल यांच्यातर्फे ‘वेगळ्या वाटा आणि वळणे’ या कार्यक्रमांतर्गत नुकतेच लेखक डॉ. दिनेश काळे यांच्या पुस्तकांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. काळे यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’ व ‘कळायला लागल्यापासून’ या तीन पुस्तकांवर पत्रकार शफी पठाण आणि आर. एस. मुंडले महाविद्याालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. सीमा पागे यांनी भाष्य केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्बाण उपस्थित होते. डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, काळे यांनी ललित लिखाणापासून तर परराष्ट्र धोरणापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याला कोणतेही 'लेबल' लावता येत नाही. इतक्या कमी वयात ५० वर पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यातून त्यांचा लिखाणाचा व्यासंग स्पष्ट होतो. प्रा. सीमा पागे म्हणाल्या, डॉ. काळे या लेखकाच्या आत एक मनोचिकित्सक दडलेला आहे. यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’, ‘कळायला लागल्यापासून’ या तिन्ही पुस्तकांमध्ये तो मनोचिकित्सक वेगवेगळया पातळीवर व्यक्त होत असतो. त्यांचे लिखाण हळूवार सोप्या भाषेत असल्याने ते वाचकांना लगेच आपलेसे करते. शफी पठाण यांनी पुस्तकांवर भाष्य करताना यात विशद करण्यात आलेली वर्तमान राजकीय परिस्थिती आज संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. भारताच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, धर्मकारणाचा संबंध राजकारणाशी आहे. त्यामुळे या देशातील कुणीही मनात असो वा नसो स्वत:ला राजकारणापासून वेगळे करू शकत नाही. परंतु नैतिकतेची सर्व बंधने मोडून आज राजकारण ज्या वळणावर पोहोचले आहे त्या वळणावर सामान्य नागरिकांनी काय करावे, याचे मार्गदर्शन काळेंच्या पुस्तकात वाचकांना मिळते, याकडेही पठाण यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक डॉ. दिशेन काळे तर संचालन अचिता देशमुख यांनी केले.
काळेंच्या लिखाणात समाजभावनेचा निचरा : विलास देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:58 AM
साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.
ठळक मुद्देकाळे यांच्या तीन पुस्तकांवर चर्चा