नागपूर : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल ४८ वर्षांनंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान नागपुरात विज्ञानाचा उत्सव होणार आहे. यासाठी भव्यदिव्य तयारीही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुंदर अशी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. सध्या ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असली तरी ती पाहिल्यावर विद्यापीठावर टीका होत आहे.
या निमंत्रण पत्रिकेत नागपुरातील अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या स्थळांना स्थान देण्यात आले आहे. मात्र त्यात देशातच नव्हे तर जगात ओळख असलेल्या दीक्षाभूमीला मात्र स्थान देण्यात आले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मदीक्षा घडवून आणली ती दीक्षाभूमी आज बौद्ध धम्माचे जागतिक प्रतीक ठरले आहे. बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म म्हणून ओळखला जातो. त्याच धम्माचे प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीचा विसर राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाला पडल्याची खंत व्यक्त करीत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे.