नागपूर : समोर संकटांचा डोंगर असला तरी त्याच्यावर जिद्दीच्या हातोड्याने घाव करत यशाचा मार्ग शोधणाऱ्यांची समाज निश्चितच दखल घेतो. दिव्यांग असूनदेखील ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशाच एका नागपूरकरांकडून करण्यात येणाऱ्या समोसा विक्रीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान ‘व्हायरल’ झाला आहे.
सूरज असे संबंधित समोसा विक्रेत्याचे नाव आहे. तो दुपारी तीन ते सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत ट्रायसिकलवर बसून समोसा विकतो. पायाने दिव्यांग असूनदेखील आयुष्यात तो आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायांवर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसा समोसे विकून तो घरखर्चाला हातभार लावतो सोबतच युपीएससीची तयारीदेखील करत आहे.
त्याचे बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झाले असून त्याला नोकरी मिळू शकली नाही. स्पर्धा परीक्षेत स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करण्याचा त्याने संकल्प घेतला असून समोसा विक्रीतून तो अभ्यासाचे साहित्यदेखील विकत घेतो. एका फूड ब्लॉगरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेक ‘ॲस्पिरंट’ला हा व्हिडिओ नवीन प्रेरणा देणारा ठरतो आहे हे विशेष.