सुमेध वाघमारे नागपूर : गरीब रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना असल्यातरी त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज असते. मात्र निराधार रुग्णांकडे हे कागदपत्रही राहत नसल्याने शासकीय रुग्णालयांंना उपचारच नाही तर इतर सोयी देणेही अवघड जाते. अश्यावेळी वैद्यकीय सामाजिक अधीक्षकांनी केलेली मदतच त्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. नुकतेच एका वयोवृद्ध व निराधार रुग्णसाठी सामाजिक अधीक्षकांसह काही सामाजिक संघटना धाऊन आल्याने वेळीच उपचार झाले, सोबतच त्यांचा निवासाचीही सोय सुद्धा झाली.
कॉटन मार्केट येथील हनुमान मंदिरात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एक निराधार वृद्ध व्यक्ती राहत होते. १० फेब्रुवारी रोजी मंदिरात काही गुंड शिरले. त्यांनी त्या वृद्धाला पैशासाठी मारहाण केली. त्यांच्या जवळ जे काही होते ते हिसकावून पळून गेले. या मारहाणीत वृद्धाचा एक हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. पोलिसांनी अशा अवस्थेत त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोन्ही पाय व एका हातावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. परंतु हाड जोडण्यासाठी ‘इम्प्लांट’ची गरज होती. वृद्धाकडे कुठलेच ओळखपत्र, राशन कार्ड नव्हते. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मदत मिळणे शक्य नव्हते. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ही माहिती समाजसेवा अधीक्षक नरेश नासरे यांना देऊन मदत करण्याचा सूचना केल्या.
नासरे यांनी वृद्धाच्या खर्चाच्या व्यवस्थेसाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे ठरवले. सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला याची माहिती दिली. त्यांनी लागलीच ‘इम्प्लांट’ उपलब्ध करून दिले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु वृद्धाला उभे राहण्यास आणखी काही महिन्याचा कालावधी लागणार असल्याने त्यांच्या पूनर्वसनासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु रुग्ण चालू-फिरू शकत नसल्याने अनेक वृद्धाश्रमाने आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला. अखेर उमरी पठार तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील संत श्री डोला महाराज वृध्दाश्रमाने रुग्णाला आहे त्या परिस्थितीत स्वीकारण्याची तयारी दर्शवली. परंतु रुग्णाला सोडून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय नव्हती. यामुळे पुन्हा सेवा फाउंडेशनला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानंतर ३० मार्च रोजी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.