नागपूर : समाजवाद हा मूळ विचार नाही, तर साम्यवादात झालेली सुधारणा होय, असे मत प्रख्यात चिंतक व लेखक सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात व्यक्त केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व मीडिया वॉच पब्लिकेशनच्या वतीने आयोजित सुरेश द्वादशीवार लिखित ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांच्यासह मीडिया वॉचचे अविनाश दुधे, डॉ. सागर खादीवाला, डॉ. श्रीकांत तिडके, प्रेम लुनावत व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजवाद हा अंत्योदयाचा पुरस्कार करतो. हा विचार एकेकाळी सर्व धर्मांनी मानला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’मध्येच समाजवाद दडला आहे. मात्र, कालांतराने लोकांनी धर्माच्या श्रद्धा स्वीकारल्या आणि विचारांना तिलांजली दिली. भांडवलदारांनी सरकार, धर्म, राजकारण सगळे ताब्यात घेतल्याने गरिबांच्या बाजूने कुणीच उभा नाही. एवढेच नव्हे तर जगाच्या इतिहासात कोणताही धर्म, गुरू किंवा ईश्वर गरिबांच्या बाजूने उभा असल्याचे दिसत नाही. मात्र, गरीब आपल्या गरिबीचा प्रश्न उपस्थित करत कधीच संघटित होत नाही, ही विवंचना आहे. गरिबांमध्ये गरिबीची चीड जोवर निर्माण होत नाही, तोवर ते संघटित होऊ शकत नाही आणि म्हणूनच समाजवादाला मरगळ आल्याचे सुरेश द्वादशीवार यावेळी म्हणाले. यावेळी श्रीमंत माने व देवेंद्र गावंडे यांच्यासह गिरीश गांधी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी केले तर आभार डॉ. सागर खादीवाला यांनी मानले.
.................