नेताजी राजगडकर : प्रथम स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा नागपूर : नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण आणि राजकारणातही यशस्वीपणे कार्य करून माणसे जोडून ठेवणारा हा अफलातून कार्यकर्ता आणि नेता माणूस होता. समाजासाठी सातत्याने लढा देणारा आणि साहित्यातून माणसांच्या वेदना मांडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लढवय्या माणूस आज आपल्यात नाही, याची खंत वाटते. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यामुळेच नेताजी राजगडकर यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना अधिक व्याकूळ करणारी आहे. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाचा भार आईवर पडला. गरिबीचे चटके सहन करीत बालपण गेले. त्यानंतर मोठे भाऊ राजाभाऊ यांना शिक्षकाची नोकरी लागली आणि त्यांनी नेताजींसह भावंडांना शिकविले. शिक्षणाचे महत्व ओळखून नेताजी यांनीही अभ्यासात परिश्रम घेतले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांना प्राचार्य राम शेवाळकर आणि मॉरिस कॉलेजमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांचे मार्गदर्शन लाभले. यातूनच त्यांची साहित्य प्रतिभा बहरत गेली. शिक्षण सुरू होते पण गरिबीने पिच्छा पुरविला होता. त्यातच नोकरीसाठीही प्रयत्न सुरू होते पण कम्युनिस्ट म्हणून काही संधी नाकारल्या जात होत्या. यवतमाळमध्ये असताना नेताजींनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लहान-लहान आंदोलने सुरू केली. त्यामुळेच ‘चळवळ्या नेताजी’ अशी त्यांची ओळख झाली. त्यांचे मोठे बंधू राजाभाऊ यांनी वणीला आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात आदिवासींचे ज्येष्ठ नेते बाबुराव मडावी उपस्थित होते. त्या मेळाव्यात नेताजींनी केलेले भाषण, त्यांची भाषाशैली यामुळे त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. एखादा मुद्दा मांडण्याची त्यांची पद्धत आकर्षक आणि प्रभावी होती. ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या तालमीत तयार झालेले हे वक्तृत्व होते. येथून नेताजींवरचा विश्वास वाढत गेला आणि नेताजी लोकनेते झाले. पण पैशांची कायम चणचण असायची. अशातच महत्प्रयासाने नागपूर आकाशवाणीवर नोकरी लागली. पण राजकारणाकडे त्यांचा कल असल्याने कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडली. लोकांचा विश्वास जिंकल्याने त्यानंतर निवडणुकीत आमदार म्हणूनही ते जिंकून आले. विधानसभेत आदिवासींच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, महागाई, शिक्षण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी केलेले जळजळीत भाषण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारे होते. अतिशय पोटतिडकीने त्यांनी हे प्रश्न मांडले. अत्यंत परखडपणे मते मांडणारा आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता न्यायासाठी लढणारा हा लढवय्या नेता जनतेसाठी दुर्मिळच होता. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला. (प्रतिनिधी)
समाजकारण करणारा लढवय्या माणूस
By admin | Published: July 18, 2015 2:57 AM