लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणीतरी पुढाकार घेतला आणि प्रोत्साहन दिले म्हणून मी पुढे आलो. साहित्याच्या बाबतीत असलेली उदासीनता टाकून समाजाने आपल्या जवळपासच्या लेखकांना, कवींना, कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, त्यांच्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उर्दू, मराठी व हिंदी साहित्याचे प्रसिद्ध अनुवादक डाॅ. मोहम्मद असदुल्लाह यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३६व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांना यशवंतराव चव्हाण विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
मी कधी तरी गांधी यांच्याकडे आलो आणि संवाद साधला. तेथूनच त्यांची मदत मिळणे सुरू झाले आणि अनुवादाच्या क्षेत्रात झेप घेता आली. आपल्या आजूबाजूला अनेक होतकरू आहेत. मात्र, सहकार्य मिळत नसल्याने ते मागे पडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके उपस्थित होते. प्रास्ताविक रेखा दंडिगे-घिया यांनी केले. निवेदन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर आभार रमेश बोरकुटे यांनी मानले.
...........