लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशातील काही तत्त्वांमुळे अस्वस्थ वाटत असल्याचे लोक म्हणतात. परंतु त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. विद्येमुळे समाजात सकारात्मक वाढते. जर विद्येचा योग्य उपयोग झाला कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. श्री नागपूर गुजराती मंडळद्वारा संचालित व्हीएमव्ही कॉमर्स, जेएमटी आर्ट्स अॅण्ड जेजेपी सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला श्री नागपूर गुजराती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत ठाकर, श्री नागपूर गुजराती मंडळाचे अध्यक्ष योगेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी. कारिया, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.ब्रिटिशांच्या काळापासून देशाने अनुभव घेतला आहे की राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कायम चिथावणी दिली जाते. प्रत्यक्षात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची स्वत:ची काहीच शक्ती नसते. परंतु समाजात कर्तृत्व, सक्रियता व सकारात्मकतेच्या प्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे लोकांना देशात अंधकारमय वातावरण असल्याचे वाटते. आपल्या देशात विविधतेत एकता नव्हे तर एकतेची विविधता आहे. सर्व वैविध्यांचा स्वीकार केला तर आपलेपणाच्या भावनेतून हा अंधकारदेखील दूर होतो, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. आपली संस्कृती ही स्वार्थाची नसून आपुलकीची आहे. स्वार्थ आणि दरी निर्माण करणाऱ्या तत्त्वांना जवळ करण्याऐवजी प्रेमाचा स्वीकार करायला हवा, असेदेखील ते म्हणाले. चंद्रकांत ठाकर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन व देशभावना डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. के.पी.कारिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.सोनू जेसवानी यांनी संचालन केले.
राजकारण म्हणजे धोक्याची घंटाचराजकारणात धोक्याची घंटा वाजते. कारण राजकारण म्हटले की स्वार्थ येतो. अनेकदा प्रेम व आपुलकी दूर करणारा स्वार्थ निर्माण होतो. स्वार्थ आला की प्रेम काम करत नाही, असे सरसंघचालक म्हणाले.शैक्षणिक संस्थांत आपलेपणा टिकावाकुठलीही विद्या घेत असताना त्याचा उद्देश काय याचा विचार व्हायला हवा. जगासाठी विद्याचे उद्देश सुख आहे. परंतु आत्मिक समाधान जास्त महत्त्वाचे असते. जर आपलेपणाच टिकला नाही तर ज्ञानाचा योग्य उपयोग होत नाही. मग विद्या असणारे लोक विवादांमध्ये जास्त रस घेतात. विद्येचा उपदेश वाद नव्हे तर सर्वांना आपले करणे हा असला पाहिजे. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थांत आपलेपणाचा व्यवहार झाला पाहिजे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘जेएनयू’तील वादांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.