नागपूरकर कलावंतांचे सादरीकरण : दर महिन्यात एकांकिकेचे सादरीकरण नागपूर : सृजनाचा उत्सव म्हणजे पावसाळा. मृग नक्षत्रात पडणारा पाऊस अन् रोपांचे अंकुरलेपण. त्यांची होत जाणारी वाढ आणि त्यानंतर त्यांचे वृक्षात होणारे परिवर्तन. हा प्रवास निसर्गाचे सर्जनच असते. मानवी आयुष्यातही बाळाच्या जन्मापासून त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो. हळूहळू शरीरही बाळसे धरते आणि पौंगडावस्था आणि आयुष्याला लोभस, मोहक वळण देणारी तारुण्यावस्था. हाच काळ संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा आणि स्वत:चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करणारा असतो. हा प्रवास अतिशय संवेदनशीलतेने मांडणारे नाटक ‘मृगाचा पाऊस’ नुकतेच सादर करण्यात आले. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेले हे नाटक रसिकांची पकड घेणारे आणि दाद घेणारे ठरले. भाजप सांस्कृतिक आघाडी आणि संजय भाकरे फाउन्डेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या एकांकिका महोत्सवात इरावती कर्णिक लिखित ‘मृगाचा पाऊस’ ही एकांकिका सादर करण्यात आली. रहाटे चौक येथील साईकृपा मंगल कार्यालयात ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश लुंगे यांनी केले. युवावस्थेपासून आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या निरागस मनाची हळूहळू येणारी प्रगल्भता यात व्यक्त करण्यात आली आहे. बाल्यावस्था ते युवावस्थेत होणारे शारीरिक बदल, आईचे नसणे आणि मुलगी आणि बापाचे संवेदनशील नात्यातून ही कथा उकलत जाते. सातत्याने मुलांच्याच सहवासात वाढलेली ही मुलगी म्हणजे स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांची स्वतंत्र व्यक्तिरेखाच आहे. पण समाजच लिंगभेद करतो आणि त्याचा परिणाम या नात्यांवर होतो. त्यातल्या निकोपतेवरही परिणाम होतो. हा लिंगभेद कमी अधिक प्रमाणात सातत्याने मनावर बिंबविला जातो किंबहुना सामाजिक स्थितीत तशी असते. स्वाभाविकपणे स्त्री-पुरुष नात्यातील निकोपतेवर समाजाचा दृष्टीकोन हावी होतो. हे वास्तव लेखिकेने सूक्ष्मपणे टिपले आहे. यात सम्राज्ञी वैद्य, श्वेता पत्की-देशपांडे, मंगेश बावसे, सचिन गिरी, संजीवनी चौधरी, आदित्य धुळधुळे आणि संजय भाकरे यांनी भूमिका साकारल्या़ सूत्रधार म्हणून दिलीप देवरणकर यांनी जबाबदारी सांभाळली़ संगीत केयूर भाकरे, प्रकाश योजना विशाल यादव व मकरंद भालेराव आणि नेपथ्य मकरंद काळे, हितेश भगत व प्रियंका नंदनवार यांनी केले़ निर्मिती संजय भाकरे व कुणाल गडेकर यांची होती़ यावेळी आसावरी रामेकर व रूपेश पवार या युवा कलावंतांना युवा रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़या महोत्सवाअंतर्गत प्रत्येक महिन्यात एक एकांकिका व युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, २२ जुलै रोजी समीर विध्वंस लिखित व हरीश इथापे दिग्दर्शित ‘हाफ पॅन्ट’ ही एकांकिका सादर होणार आहे़ याप्रसंगी श्रीकांत देशपांडे, गिरीश व्यास, ज्येष्ठ रंगकर्मी बापू उपाख्य अनिल चनाखेकर, राजेश बागडी उपस्थित होते़निर्मिती संजय भाकरे व कुणाल गडेकर यांची होती़ यावेळी आसावरी रामेकर व रूपेश पवार या युवा कलावंतांना युवा रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़या महोत्सवाअंतर्गत प्रत्येक महिन्यात एक एकांकिका व युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, २२ जुलै रोजी समीर विध्वंस लिखित व हरीश इथापे दिग्दर्शित ‘हाफ पॅन्ट’ ही एकांकिका सादर होणार आहे़ याप्रसंगी श्रीकांत देशपांडे, गिरीश व्यास, ज्येष्ठ रंगकर्मी बापू उपाख्य अनिल चनाखेकर, राजेश बागडी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
उमलत्या वयाचा संवेदनशील ‘मृगाचा पाऊस’
By admin | Published: June 25, 2014 1:22 AM