नागपूर : बाळाला जन्मास घालून आई देवाघरी निघून गेली. तान्हुले बाळ दुधासाठी आक्रंदत होते. काय होणार? कसे होणार? बाळाला दूध कोण देणार? एक ना अनेक प्रश्न ! पण मातृहृदय द्रवले. नागपुरातील दोन ‘यशोदा’ त्या बाळासाठी धावल्या. पोटच्या बाळाच्या हक्काचे दूध ‘त्या’ नवजातासाठी दिले. आज ते बाळही तग धरतंय आणि ममतेची अमृतवेलही माणुसकीच्या जमिनीत घट्ट मूळ धरतेय!ही मानवतावादी कहाणी आहे नागपुरातील. ठाणे येथे नोकरीनिमित्त पतीसह स्थायिक असलेली एक महिला पहिल्या बाळतंपणासाठी नागपूरला आपल्या आईकडे आली होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. येथील एका रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सातव्या महिन्यातच प्रसृत होऊन ती मृत पावली. आई गेली. आता या असमयकालीन (प्रिमॅच्युअर) बाळाला वाचविण्याचे आव्हान होते. त्याच्या दुधाचा प्रश्न होता. डब्याचे प्रोटिनयुक्त दूध पचायला जड असल्याने देणे शक्य नव्हते. अखेर सोशल मीडिया मदतीला धावला. नागपूर मॉम्स क्लब या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर इंडियन या इन्स्टॉग्रामवरील ग्रुपवर नवजात बाळाला मातेच्या बाळाला दुधाची गरज असल्याची माहिती देण्यात आली. ती वाचून नागपुरातील दोन महिला आणि त्यांचे कुटुंबीय स्वयंप्रेरणेने पुढे आले. मे महिन्यापासून दीड महिना त्यांनी स्वत:च्या बाळाच्या हिश्श्यातील दूध ‘त्या’ला पुरविले.यशोदेच्या रूपाने धावून आलेल्या मातांच्या दुधावर जगलेले ‘ते’ बाळ आता सुखरूप असून तग धरत आहे. प्रकृती सुधारल्याने बाळाला घेऊन त्याचे बाबा अलीकडेच ठाणे येथे आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.ओळखही नसताना परक्या बाळाला दूध पुरविणाऱ्या या माता आहेत ॲड. भूमिका सारडा आणि आसावरी रत्नपारखी. ॲड. सारडा या नागपुरातील हायकोर्टात प्रॅक्टीस करतात. त्यांना तीन महिन्याचे बाळ आहे. सोशल मीडियावर आवाहन वाचताच त्यांनी तयारी दर्शविली. आसावरी रत्नपारखी या पतीसह बंगलोरमध्ये एका कंपनीत नोकरी करतात. बाळंतपणासाठी आईकडे नागपूरला आल्या आहेत. त्यांना दोन महिन्याचे बाळ आहे. सोशल मीडियावरून माहिती कळताच त्यांनी तयारी दर्शविली. कुटुंबीयांनीही पुढाकार घेतला, पाठिंबा दिला.
दररोजचा ३० किमीचा प्रवासया घटनेत सुनीत नारायणे या २९ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता युवकाची धडपड कौतुकास्पद आहे. सुरुवातीला या दोन्ही मातांकडून दूध येऊन रुग्णालयातील बाळाकडे पोहचविण्याचे काम त्याचा मित्र करायचा. मात्र त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुनीतने जबाबदारी स्वीकारली. कार चालवता येत नसल्याने भर उन्हात दुचाकीवरून रोज सुमारे तीस किमी प्रवास करून त्याने दीड महिना दूध पोहचवले. उन्हामुळे दूध खराब होऊ नये, योग्य तापमान राखले जावे यासाठी आईसबॉक्सचा वापर केला. कधी दिवसातून एकदा तर कधी दोनदा चकरा मारून त्याने बाळाला दूध पुरविले.