निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या निरीक्षणात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जमिनीत आयरन (लोह), झिंक आणि सल्फर यांसारखे सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत चालले आहे. शिवाय नायट्रोजनची कमतरताही निर्माण झाली आहे.
जिल्हा कृषी विभागाने गेल्या काही दिवसात सर्व तालुक्यातील गावांमध्ये जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. तसा रामटेक वगळता सर्व तालुक्यांमध्ये सुपिकता इंडेक्स समाधानकारक आहे. रामटेक तालुक्यामध्ये नायट्राेजन, फाॅस्फेट व पाेटॅशियम या मुख्य अन्न द्रव्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. हा इंडेक्स अनुक्रमे १.०७, १.८६ व २.०९ एवढा आहे. दरम्यान सर्व तालुक्यामध्ये नायट्राेजनची कमतरता निर्माण झाली आहे. दरम्यान रामटेक वगळता सर्व तालुक्यामध्ये फाॅस्फेट व पाेटॅशियमचे प्रमाण कळमेश्वर, काटाेल, कामठी, माैदा, नरखेड, पारशिवनी, सावनेर या तालुक्यांमध्ये अधिक तर उर्वरीत तालुक्यात चांगले आहे.
मात्र चिंतेची बाब म्हणजे सर्व तालुक्यांमध्ये जमिनीत लाेह, झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता निर्माण झाली आहे. काॅपर, मॅगनिज, बाेराॅन हे घटक मात्र समाधानकारक आहेत. पिकांच्या वाढीपासून ते पिक येण्यापर्यंत किंवा फळ झाडाला फळ येईपर्यंत हे सर्व घटक महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. पीएच ७.४ ते ८.४ असल्याने जमिन आम्लयुक्त हाेत असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. जमिनीचा पाेत खराब हाेत चालल्याने सुपिकता घसरली असून उत्पादन कमी हाेत आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या अतिवापरावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
१८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक
कृषी विभाग रासायनिक खतांचा अतिवापर कमी करण्यासाठी ११ ते १७ मे पर्यंत जनजागृती सप्ताह राबवित आहे. जमिनीची सुपिकता पातळी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय, जैविक खतांसह रासायनिक खतांचा याेग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.. यासाठी जिल्ह्यातील १८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावला असून तेथील जमिनीच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक पिकासाठी आणि फळशेतीसाठी किती प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सुक्ष्म अन्नद्रव्य कमी हाेणे म्हणजे पिकांच्या वाढीपासून ते पीक पूर्ण येईपर्यंत परिणाम करणारे आहे. आयरनमुळे धान, गहू अशा पिकांना मजबुती येते, सल्फर फळ येण्यासाठी महत्त्वाचे आहे तर बाेराॅनसारखे घटक फुले येण्यासाठी आवश्यक आहेत. जैविक खतांमध्ये वातावरणातील नायट्राेजन जमिनीत शाेषण करण्याची व पिकांना पुरविण्याची क्षमता असते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे आवश्यक आहे.
- अरविंद्र उपरीकर, कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विभाग