नागपूर : गळणारी पाने आणि शरद ऋतूच्या सौम्य आलिंगनाने चिन्हांकित केलेल्या ऑक्टोबर महिन्यात अंतराळातील दोन आकर्षक देखावे पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. ही दुहेरी भेट सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाची होय. १४ ऑक्टाेबरला सूर्यग्रहण आहे पण भारतीयांना ते प्रत्यक्ष आकाशात पाहता येणार नाही. मात्र २८ ऑक्टाेबरला हाेणाऱ्या चंद्रग्रहणाची मेजवानी मात्र निश्चित मिळेल.
१४ ऑक्टोबर चे कांकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतू हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार सकाळी ८.३३ वाजता ग्रहण सुरू होईल आणि दुपारी २.२६ वाजता संपेल. भारतात प्रत्यक्ष आकाशात पाहता येणार नसले तरी इंटरनेटच्या माध्यमातून ते पाहण्याची संधी खगोलप्रेमी व अभ्यासकांनी सोडू नये. यापूर्वी २० अप्रिल रोजी आंशिक सूर्यग्रहण घडले होते.
पृथ्वीचा उपग्रहण चंद्राला २८ ऑक्टोबर रोजी ग्रहण लागेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून भारत, महाराष्ट्रातूनही दिसेल. यापूर्वी ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले होते. २८ऑक्टोबरचे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण होय. हे ग्रहण जगातील युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतुन दिसेल. रात्री १.०५ मिनिटाने ग्रहणाची सुरुवात होईल. रात्री १.४४ वाजता मध्यम तर रात्री २.२२ वाजता ग्रहण सुटेल. आंशिक ग्रहणाचा चंद्र केवळ १० टक्के झाकला जाईल. विशेष म्हणजे १० ऑक्टोबरला चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर (अपाेगी) असेल. त्यानंतर चारच दिवसात ग्रहण होत आहे. त्यामुळे चंद्राचा आकार अर्थातच लहान दिसेल. हे चंद्रग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनीही पाहता येईल.
या महिन्यात आणखी काय?
- ९ ऑक्टोबर ला ड्राकोनिड उल्कावर्षाव- १८ ऑक्टोबर ला जेमिनिड उल्कावर्षाव- २२ ऑक्टोबर ला ओरिओनीड उल्कावर्षाव- २५ ऑक्टोबर ला लिओनीड उल्कावर्षाव पहावयास मिळणार आहे.