आशिष दुबे
नागपूर : आजचा युवकाची अपेक्षा असते की, चांगली नोकरी मिळावी, मोठे घर असावे, कुटुंबीयांसोबत एक सुखद जीवन जगता यावे, परंतु ४६ वर्षीय डॉ.चेतनसिंह सोलंकी यांचे विचार आजच्या युवा विचारांपेक्षा बरेच वेगळे आहे. देशात सोलर गांधीच्या नावाने प्रसिद्ध डॉ.सोलंकी यांच्याजवळ सर्वच काही होते. आपल्या कुटुंबीयांसोबत सुखद जीवन जगत असताना, ते देशासाठी सौरऊर्जेतून स्वराज्य आणण्यासाठी एनर्जी स्वराज्य यात्रेवर निघाले आहेत. ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे.
डॉ.सोलंकी हे आयआयटी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सौरऊर्जेतून स्वराज्य घडविण्याचे मिशन त्यांनी एकहाती घेतले असून, यासाठी त्यांनी कुणाकडून एक रुपयांचा निधीही घेतला नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित एका स्पर्धेत १ लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला होता. ही राशी व त्यांच्याजवळील जमापुंजीतून ते ही यात्रा करीत आहे. त्यांनी या यात्रेसाठी एका बसमध्ये घर, प्रयोगशाळा व प्रशिक्षण देण्याचे केंद्र बनविले आहे. डॉ.सोलंकी यांनी २०२० मध्ये ही यात्रा सुरू केली होती. गेल्या वर्षभरात त्यांनी देशातील काही राज्याचा १३ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ८ डिसेंबर रोजी ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचले. महाराष्ट्रात एक महिना राहून ते आंध्र प्रदेशकडे रवाना होणार आहे.
डॉ. सोलंकी यांनी प्रण केला की, ११ वर्षे ते आपल्या जीवनाचा प्रवास बसमध्येच करणार आहे. भारतभर यात्रा करून लोकांना ऊर्जेचे महत्त्व पटवून देणार आहेत. या प्रवासात त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. ते म्हणाले की जलवायू परिवर्तनामुळे भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतेत आहे. जगातील सर्वच देश एका व्यासपीठावर येऊन उपाययोजना करीत आहेत. या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाचा साथ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. या यात्रेचा उद्देश लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा आहे. यात्रेच्या दरम्यान ते शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. देशाला महाशक्ती बनविण्यासाठी युवक कसे योगदान देऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करतात.
- भारत बनू शकते महाशक्ती
डॉ. सोलंकी म्हणाले की, भारत देश महाशक्ती बनू शकतो. भारताची आंतरिक व बाह्यशक्ती उत्तम आहे. तुलनेत जगातील अन्य देशाची ही शक्ती कमजोर आहे. भारताला जर सौरऊर्जेत आत्मनिर्भर बनविले, तर आपला देश जगात महाशक्ती बनू शकतो.