नागपूर: पाणीपुरवठा योजना, सरकारी कार्यालय, शाळा आदींच्या वीजबिलात बचत करण्यासाठी राज्याचे विविध विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतून सौरउर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी निधी दिला जातो. नागपूर जिल्हा परिषदेच्या २७८ शाळांवर सोलर लावण्यात आले आहेत. या सोलरची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या महाऊर्जा अर्थात मेडा यांनी नेमलेल्या कंत्राटदारांची आहे. परंतु कंत्राटदारांकडून दुरुस्ती केली जात नसल्याने २२ प्राथमिक शाळांचे सोलर प्रकल्प अडचणीत आले आहेत. वीज पुरवठा सुरळीत केव्हा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या १५८२ शाळा कार्यरत आहेत. या शाळांना महावितरणचे विजेचे बिल भरण्याचा प्रश्न असल्याने प्रशासनाने सोलर पॅनलच्या माध्यमातून शाळांना सोलर वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून पहिल्या टप्यात २७८ शाळांमध्ये सौर पॅनलचे काम हाती घेण्यात आले. शासनाच्या 'मेडा' या एजन्सीने हे काम पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात पॅनल व्यवस्थित सुरु होते. मात्र वेळेवर देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने हे सोलर पॅनल बंद पडत आहेत.
कळमेश्वर तुक्यातील उषाकी, रामटेकमधील छोटी रमजान, खालई हिवरा, मांद्री, कांद्री, कडबीखेडा, डोंगरताल, मसला, तर नागपूर तालुक्यातील डोंगरगाव, उमरेड येथील वडद, सूरगाव, पारशिवनी तालुक्यातील भागेमहारी, नयाकुंड, बोरी शिंगोरी, तामसवाडी, मौदा तालुक्यातील धामणगाव, इसापूर, कुंभारी, पिपरी, निमखेडा व कुही तालुक्यातील राजोला, वीरखं आदी शाळांतील सोलर प्रकल्प बंद पडल्याची माहिती आहे.