आनंद शर्मा
नागपूर : रेल्वे मंत्रालयाने पर्यावरण रक्षणासाठी २०३० पर्यंत ग्रीन एनर्जीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपली विजेची गरज पूर्ण करण्यासह आर्थिक बचतीच्या दृष्टीने मध्य रेल्वेत सौर आणि पवन उर्जेचे जाळे पसरविण्यात येत आहे. यात मध्य रेल्वेच्यावतीने छत आणि जमिनीवर सौरऊर्जा पॅनल लावण्यात येत आहेत. त्यासोबतच पवनऊर्जा तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.
रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने नागपूर, मुंबई, सोलापूर, पुणे, भुसावळ या पाच रेल्वे विभागात ४ वर्कशॉपमध्ये १४.३७९ मेगावॅट क्षमतेचे रुफटॉप सोलर पॉवर प्लँट लावण्याची योजना तयार केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४.९२ मेगावॅट क्षमतेचे प्लँट विविध रेल्वे स्टेशनसह वर्कशॉप आणि नागपूर ‘डीआरएम’ कार्यालयाच्या छतावर लावण्यात आले आहेत. या प्लँटपासून वर्षाला ६.४ मिलियन युनिट वीज उत्पन्न होत असल्यामुळे वर्षाला ४.१ कोटीची बचत होत आहे. इतर सोलर प्लँटच्या निर्मितीचे काम सुरु आहे. ते लागल्यानंतर १२.४३ मेगावॅट वीज उत्पन्न होऊन वर्षाला ७.३७ कोटींची बचत होणार आहे.
जमिनीवरील सौरऊर्जा यंत्रापासून वाचणार १०७ कोटी
मध्य रेल्वेने सोलर पॉवर प्लँट लावण्यासाठी रेल्वे रुळाच्या आजूबाजूच्या जमीन आणि इतर खुल्या परिसराची निवड केली आहे. येथे लागणाऱ्या सोलर पॉवर प्लँटपासून तांत्रिक कामांसाठी वर्षाला १४३ मिलियन युनिटची निर्मिती होणार आहे. त्यामुळे विजेच्या बिलात ४३ कोटी रुपयांची बचत होईल. अतांत्रिक कामांसाठी जमिनीवर ७१ मेगावॅट क्षमतेचे सोलर पॉवर प्लँट लावण्यात येणार आहेत. त्यापासून ९३ मिलियन युनिट वीज निर्माण होऊन ६४ कोटींची बचत होणार आहे. जमिनीवरील प्लँटपासून रेल्वेची वर्षाकाठी १०७ कोटींची बचत होणार आहे.
सांगलीत पवनऊर्जा यंत्र
मध्य रेल्वेतर्फे सांगलीत रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून पवनऊर्जा यंत्र लावण्यात येत आहे. यातील ५०.४ मेगावॅट क्षमतेच्या विंड मिल तांत्रिक कामांसाठी आणि ६ मेगावॅट क्षमतेच्या विंड मिल अतांत्रिक कामांसाठी लावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या पवनऊर्जा यंत्रापासून मध्य रेल्वेने ६७.७६ मिलियन युनिटची निर्मिती करून ३९ कोटींची बचत केली आहे. अतांत्रिक कामांसाठी लावण्यात येत असलेल्या विंड मिल २०२०-२१ मध्ये तयार होतील. त्यामुळे वर्षाला ४.२ कोटींची बचत होईल.
सर्वाधिक ईएस प्रमाणपत्र
‘पर्यावरण रक्षणासोबत आर्थिक बचतीच्या दृष्टीने मध्य रेल्वेत सौर आणि पवन ऊर्जा यंत्र लावण्यात येत आहेत. काही यंत्र लावण्यात आले आहेत. सर्व यंत्र लागल्यानंतर मध्य रेल्वेची १६१.६७ कोटींची बचत होईल. भारतीय रेल्वेत इतर झोनच्या तुलनेत सर्वाधिक २०१७९ एनर्जी सेव्हींग सर्टिफिकेट मिळाले आहेत.’
-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
................