नागपूर - कुंभमेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिर मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?' असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. मात्र हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनीच याचे उत्तर दिले आहे. 'आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे होते' असं भागवत यांनी म्हटलं आहे.
नागपूरमध्ये गुरुवारी (17 जानेवारी) प्रहार समाज जागृती संस्था रजत जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. जवान शहीद होण्याच्या घटना वाढत जात असल्याचे सांगताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या काळाचा आवर्जून उल्लेख केला. जेव्हा देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळत नव्हते तेव्हा स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले जायचे. स्वातंत्र्यानंतर जर कोणत युद्ध झालं किंवा होत असेल तर सीमेवर जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाची सुरक्षा करतात. यानंतर मोहन भागवत यांनी कोणतेही युद्ध सुरू नसताना जवान शहीद होण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.