दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची ड्यूटी लावण्यात येते; परंतु प्रवासात काही प्रवासी चुकीचे आरोप लावून आरपीएफ जवानांना अडचणीत आणतात. अशा प्रसंगासाठी आता आरपीएफच्या जवानांना बॉडी वेअर कॅमेरा देण्यात येणार असून, नागपूर विभागात असे २५ कॅमेरे मागवण्यात आले आहेत.
रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या सुविधेसाठी आरपीएफ जवानांची गस्त लावण्यात येते. हे जवान संपूर्ण रेल्वेगाडीत प्रवासी सुरक्षित आहेत की नाही, हे पाहण्यासाठी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये फिरत असतात. एखाद्या प्रवाशाला काही अडचण असल्यास त्यांना हे जवान मदत करतात. अनेकदा एकट्याने प्रवास करीत असलेल्या महिला, युवतींना कुणी त्रास देत असल्यास त्यांचा बंदोबस्तही जवान करतात. परंतु कर्तव्य बजावत असताना काही असामाजिक तत्त्व जवानांवर चुकीचे आरोप लावतात. त्यासाठी आता जवानांना बॉडी वेअर कॅमेऱ्याचे कवच मिळणार आहे.
रेल्वेगाडीत कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या छातीवर हा कॅमेरा असणार आहे. यात तो ड्यूटी करीत असलेल्या संपूर्ण कालावधीचे चार ते पाच तासांचे व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. यामुळे कोणी काहीही आरोप करो ते सगळे या कॅमेऱ्यात टिपले जाणार आहे. काही दिवसांतच २५ कॅमेरे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दाखल होणार आहेत. त्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे.बॉडी वेअर कॅमेऱ्यामुळे येणार पारदर्शकताआरपीएफ जवान रेल्वेगाड्यांत कर्तव्य बजावताना काही असामाजिक तत्त्व चुकीचे आरोप लावतात. बॉडी वेअर कॅमेरा जवानांकडे असल्यामुळे त्यांच्या ड्यूटीच्या काळातील संपूर्ण नोंदी या कॅमेऱ्यात टिपल्या जाणार आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजात पारदर्शकता निर्माण होईल.-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल