- १०० एनडीएस जवानांचा कार्यकाळ संपला: ८० जणाच्या खांद्यावर भार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रस्त्यावर घाण करणारे असो की, प्लास्टिक कारवाई यात मनपाच्या उपद्रव शोध पथकाची (एनडीएस) भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कोरोना संक्रमण काळात कंटेनमेंट भागातील नागरिकांना सतर्क करण्यात या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या मास्क न बंधणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात जवान व्यस्त आहेत. दिवाळीच्या वेळी बाजारात उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यातही पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख बाजारात १५० जवान तैनात करण्यात आले होते. मात्र महापालिकेच्या तुघलकी कारभारामुळे १८० पैकी ८० जवान सध्या कार्यरत आहेत. यामुळे कोविड नियंत्रणाची यंत्रणा प्रभावी होण्याची शक्यता आहे.
एनडीएस पथकांत माजी सैनिकांची ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात ८० जवानांचा कंत्राट वाढविण्यात आला उर्वरित १०० जवानांचा कंत्राट २० नोव्हेंबर रोजी संपला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुक आचारसंहितेमुळे स्थायी समिती व सभागृहाची बैठक झालेली नाही. त्याशिवाय जवानांचा कंत्राट वाढविणे शक्य नाही. पदाधिकारी व प्रशासनाला याची जाणीव होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वास्तविक प्रशासनालाही आपल्या स्तरावर याबाबत निर्णय घेणे शक्य आहे. अशा निर्णयांना स्थायी समितीकडून कार्योत्तर मंजुरी घेता येते.
पथकातील जवानांची अतिक्रमण कारवाईसाठी मदत घेतली जाते. जवानांची संख्या घटल्याने शहरातील अतिक्रमण कारवाई प्रभावित होण्याची शक्यता आहे