लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्याही कार्याची सिद्धता संकल्पातूनच येत असते. मात्र त्यासाठी परिश्रमाचीही गरज असते. ध्येय ठरवा आणि आयुष्याच्या उद्दिष्टाकडे चालत राहा, असा सल्ला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी शिबिरार्थ्यांना दिला. कै. लक्ष्मणशास्त्री मानकर स्मृती संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात गुरुवारी सायंकाळी चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण लाखाणी होते. वनवासी कल्याण आश्रम नागपूरच्या अध्यक्ष राजेश्वरी देवी शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त धनंजय बापट, पश्चिम विदर्भ क्षेत्र प्रचारक अतुल लिमये, संस्थेचे सचिव राजीव हडप, उपाध्यक्ष केशव मानकर, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी विभागाच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,आदिवासी आणि समाजकल्याण विभागाचे बजेट सारखेच आहे, तरीही आदिवासी विभागाची कामे मागे आहेत. या विभागाची दुरवस्था पाहिल्यावर या विभागासाठी आजवर कुणी मंत्री होते की नाही, असा प्रश्न पडतो. दृष्टिहीन नेत्यांची संख्या अधिक असल्याने योग्य नियोजन झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.फक्त पगारासाठी काम करणारी यंत्रणा आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेत असल्याने शिक्षणाची दुरवस्था आहे. हे चित्र बदलायचे असेल तर स्पर्धा परीक्षांकडे वळा, स्वत:ला घडवा, असे आवाहन यांनी केले.महाराष्ट्रात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणावर कुठे आहे, हे सर्वांना माहीत आहे, तरीही आदिवासींना प्रशिक्षण देणारे बार्शी टाकळीचे प्रशिक्षण केंद्र मात्र पुण्यात आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.अतुल लिमये म्हणाले, आदिवासी समाज विविध समस्यांनी घेरलेला आहे. या समस्या नव्या पिढीने समजून घ्याव्यात. नाशिक हा प्रगत जिल्हा आहे, तरीही या प्रगत जिल्ह्यातही अविकसित पाच तालुके आहेतच. त्यात वास्तव्यास असणारे आदिवासी आहेत. हे असे का घडते, आदिवासींचा विकास का घडत नाही, हे समजून घ्या. विकासाबद्दल असलेली जनजागृती नव्या पिढीने वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.११ ऑगस्टपर्यंत हे शिबिर चालणार असून, यात दररोज पाच संवाद सत्र होणार आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून ३०० शिबिरार्थी यात सहभागी आहेत.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अरुण लखाणी यांनी केले. संचालन भारत भुजाडे यांनी तर आभार रवींद्र भोयर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संकल्पातून सिद्धी येते, पण परिश्रमाचीही गरज :अशोक उईके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:13 AM
कोणत्याही कार्याची सिद्धता संकल्पातूनच येत असते. मात्र त्यासाठी परिश्रमाचीही गरज असते. ध्येय ठरवा आणि आयुष्याच्या उद्दिष्टाकडे चालत राहा, असा सल्ला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी शिबिरार्थ्यांना दिला.
ठळक मुद्देएकलव्य एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गात आवाहन