नागपूर : भारतीय लाेक पूर्वी पंचमहाभूतालाच ईश्वर मानत हाेते, म्हणूनच निसर्ग सुरक्षित हाेता. या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याने हवामान बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय ज्ञान तंत्रातच 'ग्लोबल वार्मिंग' च्या संकटाचे समाधान शक्य आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जलबिरादरी नागपूर जिल्हा नदी समन्वयक आणि विद्यापीठ शताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणूया नदीला’ कार्यक्रम गुरुवारी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, जलबिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चूग, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली. गावातील नागरिकांना १५ कि.मी. दूरून पाणी आणावे लागत होते. निसर्गाला हानी न पोहोचवितागावाच्या बाजूला बंधारे निर्माण करत पाण्याची साठवणूक करणे सुरू केले. स्थानिक संसाधनांचा वापर यामध्ये केल्याने ते अधिक टिकाऊ बनले आणि पाण्याची साठवणूक होऊ लागली. निर, नारी, नदी म्हणजेच नारायण असल्याचे ते म्हणाले. डॉ. सुभाष चौधरी म्हणाले, पूर्वी मानवाचा समूह स्थायी होत असताना पाण्याचा स्त्रोत अर्थात नदी असलेल्या ठिकाणी स्थिरावत होते. तिथूनच मानवाच्या जीवनाला सुरुवात होत असल्याने नदी ही जीवनदायी असल्याची भावना व्यक्त केली. संचालन डॉ. अमृता इंदुरकर यांनी केले. डॉ. सोपानदेव पिसे यांनी आभार मानले.
वर्धा येथे आज आयोजन'चला जाणूया नदीला' कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सकाळी ११ वाजता निसर्ग हिल ऑक्सिजन पार्क, वर्धा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलपुरुष माननीय डॉ. राजेंद्रसिंह उपस्थित राहणार आहे.