लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : कांद्री (ता. रामटेक) येथे १३७ घरकुलांचे बांधकाम करावयाचे आहे. त्यासाठी जागेची समस्या निर्माण झाली असून, ती साेडविण्यासाठी तहसीलदारांना जागा उपलब्ध करून देणे व ज्यांची नावे या याेजनेतून वगळली आहे, त्यांचे प्रस्ताव पाठविण्याची सूचना खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे यांनी रामटेक पंचायत समितीच्या सभागृहात आयाेजित आढावा बैठकीत केली.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांच्या सर्कलमधील विविध समस्या मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदीप बमनाेटे यांनी राेजगार हमी याेजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत राेजगार सेवकांना सूचनावजा ताकीद दिली. राेजगार हमी याेजनेत व्यक्तिगत लाभ, फळबागा, पांदण रस्त्यांचे खडीकरण ही कामे युद्धपातळीवर सुरू करून राेजगार उपलब्ध करून देणे, त्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्तावित कामे पूर्ण करावी, ग्राम समृद्ध याेजनेचे आराखडे तयार करणे, १५ वा वित्त आयाेग अनुदानातून शाळा व अंगणवाडींसाठी निधी राखून ठेवणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
सध्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था फारच वाईट आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची पटसंख्या, २० ते ३० व माेठ्या शाळा यांची माहिती गाेळा करून गुणवत्ता काेणत्या स्तरावर आहे व त्यासाठी काय उपाययाेजना करता येईल, याबाबत एक महिन्यात अहवाल तयार करणे, जलमिशन अंतर्गत टाक्या दुरुस्ती, नवीन टाकी बांधणे, विहीर बांधणे, आदी कामे घेण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत माेठ्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक शाैचालय बांधणे, रमाई व शबरी घरकुल याेजनेसाठी नवीन प्रस्ताव तयार करणे, ग्रामीण भागातील डेंग्यूचा वाढता प्रभाव, प्रतिबंधात्मक उपाययाेजना धूरळणी करणे, काेरडा दिवस पाळणे, ग्रामस्वच्छता अभियान राबविणे यासह अन्य महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
बैठकीला पंचायत समिती सदस्य मंगला सराेते, रिना कठाेते, विस्तार अधिकारी (पंचायत) रामटेके, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांच्यासह विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, राेजगार सेवक यांच्यासह पंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिक उपस्थित हाेते.