कोराडी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन व जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार यांची साेमवारी (दि.१२) बैठक पार पडली. प्रलंबित समस्यांबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. कर्मचाऱ्यांची नाराजी ही आंदोलनाच्या माध्यमातून समोर येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने साेडवा, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आली.
या बैठकीला युनियनचे जिल्हाध्यक्ष जयदेव आंबुलकर, जिल्हा सचिव अशोक कुथे, उपाध्यक्ष सुनील काळसर्पे, संघटक शैलेश वाढई, कमलाकर गुडदे, अनिल आंबोने, विलास कोहळे, सचिन राऊत, गोपाल तकीत आदी उपस्थित होते. ज्या ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन आयोग लागू केला नाही, अशा सरपंच, सचिवावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, राहणीमान व त्याबाबत असलेली संभ्रमाची अवस्था दूर करणे, ऑनलाईन वेतन प्रणाली सुरू करणे, सेवाज्येष्ठता यादी व पदभरती करणे, अपघात विमा लागू करणे, तालुकास्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सभेचे आयोजन गटविकास अधिकाऱ्यांमार्फत करणे आदी बाबींकडे बैठकीत लक्ष वेधले गेले. यावर योग्य तो निर्णय घेऊन संबंधितांना तसे आदेश देण्यात येतील, अशी ग्वाही भुयार यांनी यावेळी दिली.