नरखेड : नरखेड तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची नवी आरक्षण सोडत सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली. या आरक्षणामुळे काही सरळ सरपंचपदी पोहचले तर काहींना निराश व्हावे लागले. यात आठ गावात अनुसूचित जमाती (४ महिला), ११ गावात अनुसूचित जाती (६ महिला), १९ गावामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (९ महिला), ३२ गावामध्ये सर्वसाधारण (१६ महिला) या प्रवर्गातील सरपंच असणार आहेत. हे आरक्षण २०२५ पर्यंत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना लागू राहणार आहे. देवळी, अंबाडा (सायवाडा) अंबाडा ( देशमुख), बेलोना, खंडाळा (बु.), पिंपळगाव (राऊत), जामगाव (बु.), आरंभी, मालापूर, खेडी (गो.), जुनोना (फुके), गोधनी (गायमुख), मोगरा, नारसिंगी, बानोरचंद्र, दावसा येथील सरपंच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासाठी तर माणिकवाडा, दातेवाडी, सायवाडा (अंबाडा), सिजर खराळा, मेंढला, आग्रा, येणीकोणी, मोहदी (दळवी), खरसोली, मोहदी (धोत्रा), परसोडी (दीक्षित), खराशी, खापरी (केने), विवरा, वडेगाव (उमरी) येथील सरपंचपद सर्वसाधारण पुरुषाकरिता राखीव करण्यात आले आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता भिष्णूर, तिनखेडा, रामठी, भारसिंगी, मोहगाव (भदाडे), खापाघुडन तर जलालखेडा, उमठा, मायवाडी, दिंदरगाव, भारसिंगी, घोगरा अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गाकरिता थूगावनिपाणी, देवग्राम, खेडीकर्यात, सावरगाव तर पुरुषाच्या वाट्याला खैरगाव, पेठइस्माईलपूर, मदना, वाढोणा येथील सरपंचपद आले आहे. जलालखेडा ग्रामपंचायतच्या १३ सदस्यांपैकी एकमेव अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गातून निवडून आलेले ६१ वर्षीय कैलास जगन निकोसे याना नवीन आरक्षण सोडतीत सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून न आल्याने तेच सरपंचपदी विराजमान होणार आहेत. याप्रसंगी तहसीलदार डी.जी. जाधव, नायब तहसीलदार (निवडणूक) विजय डांगोरे, भागवत पाटील, राजेश नितनवरे, सिद्धार्थ नारनवरे, गुणवंत ढोके यांच्यासह तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सरपंचपदाच्या आरक्षणामुळे कुणी आनंदी तर कुणी निराश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:37 AM