नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी अखेर सूप वाजले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला आता दीड वर्ष पूर्ण होत आहे आणि नव्या सरकारचे नागपुरातील हे दुसरे अधिवेशन होते. मात्र विरोधात असताना आमच्या संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन क रणारे आणि पाठिंबा देणारे सत्तेत येताच आमच्या मागण्या विसरले, अशा भावना धरणे मंडपातील ८० टक्के संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. त्यामुळे नेतृत्व करणारे सत्तेत गेले तरी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे फसे झाले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.दरम्यान, यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी तब्बल ११२ संघटनांनी नागपूरला हजेरी लावली. यामध्ये २४ वैयक्तिक आंदोलकांचा समावेश होता. पटवर्धन मैदानात बसलेल्या आंदोलकांचा आवाज विधानभवनापर्यंत पोहोचत नसला तरी गेले १७ दिवस हा परिसर नारे आणि घोषणांनी दुमदुमला होता. काही लोक पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ठाण मांडून बसून राहिले. मात्र अनेक संघटना समाधानी होऊन परतल्या. अशा ९४ संघटनांनी सरकारच्या समाधानकारक आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले. यामध्ये वैयक्तिक आंदोलन करणाऱ्या १८ लोकांचाही समावेश आहे. मात्र १२ संघटना आणि ६ वैयक्तिक आंदोलनकर्त्यांनी शेवटपर्यंत धरण्याची जागा सोडली नाही. काहींचे मंत्र्यांसोबत भेटूनही समाधान झाले नाही, तर काहींना सरकारच्या प्रतिनिधीसोबत भेटताच आले नाही. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीची अट घालून बसलेल्या अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काहींनी शेवटच्या आठवड्यात आपले आंदोलन सुरू केले. यातील बहुतेक संघटनांचे आंदोलन १० ते १५ वर्षांपासून सुरू आहे. विरोधात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकतर विविध संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले किंवा पाठिंबा तरी दिला होता. मागील वर्षी अधिवेशनापूर्वी नुकतेच सरकार स्थापन झाल्याने संघटना आक्रमक नव्हत्या. मात्र आता सरकारला १३ महिने झाल्याने संघटनांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या. त्यातील काहींच्या पूर्ण झाल्या तर काहींच्या पदरी निराशा आली.(प्रतिनिधी)
काहींना आश्वासन तर काहींची निराशा
By admin | Published: December 25, 2015 3:51 AM