लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : शहरातील प्रभाग क्रमांक-४ मधील बीड-बोथली रस्त्यालगतची नाली सांडपाण्याचे तुडुंब भरली असून, त्यातील सांडपाणी काही ठिकाणी रस्त्यावरून वाहात आहे. हे सांडपाणी कीटकजन्य आजारांना निमंत्रण देत असल्याने या भागातील नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. शहरातील काही भागात स्वच्छतेचा बाेजवारा उडाला असताना स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
संपूर्ण देशभर स्वच्छता अभियानाचे ढाेल बढवले जात असून, जनजागृतीवर अमाप खर्चही केला जात आहे. शिवाय, शहरांसाठी राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धाही राबविली जात असून, विजेत्या शहरांना बक्षिसे दिली जात आहे. या स्पर्धेत कुही नगर पंचायतदेखील सहभागी हाेते. मात्र, अलीकडच्या काळात नगर पंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडला की काय असे वाटायला लागले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक-४ मधील बीड-बोथली रस्त्यालगतच्या नालीतून ४५ घरांमधील सांडपाणी वाहते. ही नाली कित्येक दिवसांपासून साफ न केल्याने ती तुंबली आहे. त्यामुळे त्या पाण्याची दुर्गंधी सुटली असून, त्यात अळ्या व किडे तयार झाले आहेत. शिवाय, डासांचीही उत्पत्ती माेठ्या प्रमाणात हाेत असल्याने मलेरिया व तत्सम किटकजन्य आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. उग्र वासामुळे या भागात माेकळा श्वास घेणे कठीण झाले आहे.
काेराेनामुळे नागरिक आधीच धास्तावलेले आहेत. त्यात तुंबलेल्या सांडपाण्यामुळे इतर आजार बळावतात की काय, अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे या नालीची तातडीने साफसफाई करावी आणि नगर पंचायत प्रशासनाने नागरिकांचे आराेग्य सांभाळावे, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे.
...
स्वच्छ सर्वेक्षण माेहीम
शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण माेहिमेत कुही नगर पंचायतदेखील दरवर्षीप्रामाणे याही वर्षी सहभागी झाले आहे. त्याच्या जनजागृतीसाठी प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचे मोठमोठे बॅनर लावलेले आहेत. स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या बॅनरच्या माध्यमातून केले जात आहे. दुसरीकडे, तुंबलेल्या नाल्यांच्या माध्यमातून आराेग्याशी खेळ सुरू आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.