लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चे वाढते आकडे लक्षात घेता प्रशासनातर्फे शनिवारी व रविवारी खासगी आस्थापना बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद असली तरी शिक्षकांना बोलविण्यात येत आहे. काही महाविद्यालयांनी शनिवारीदेखील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलविले आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून काहीच दिशानिर्देश जारी न झाल्याचे कारण महाविद्यालयांकडून देण्यात येत आहे.
शनिवारी अत्यावश्यक सेवा सोडून शहरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये बंद राहतील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश जारी करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यापीठानेदेखील लेखी आदेश काढले नाहीत. यामुळेच काही महाविद्यालयांनी नियमित वेळातच शिक्षक व कर्मचाऱ्यांना बोलविले आहे. मात्र, यासंदर्भात दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते.
विभागांमध्येदेखील संभ्रम
नागपूर विद्यापीठाने लेखी आदेश न काढल्याने पदव्युत्तर विभागांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे. सध्या ऑनलाईन वर्ग सुरू असून, अनेक शिक्षक विभागात येऊन हे वर्ग घेत आहेत. आता शनिवारी यायचे की नाही याबाबत त्यांच्यासमोरदेखील प्रश्नचिन्ह होते.