होम डिलिव्हरी रात्री ११ वाजेपर्यंत, शनिवारी-रविवारी कडक बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता निर्बंधांमध्ये थोडा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकानांनाही सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी राहील. परंतु ती दुकाने केवळ एकटी (स्टॅन्ड अलोन) असावीत. असे असले तरी शनिवार-रविवारी मात्र अत्यावश्यक सेवांनाच मंजुरी देत कडक बंदी लागू राहील. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या या घोषणेनंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांनाच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी होती. आता दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ वाढवून देण्यात आली आहे. होम डिलिव्हरीच्या सेवेला रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली. पालकमंत्री राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील १५ जूनपर्यंत कडक निर्बंध जारी राहतील. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करीत प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे आदी उपस्थित होते.
महत्त्वाचे निर्णय
१५ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील. पुढच्या आठवड्यात पुन्हा आढावा घेणार.
अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.
एकटी दुकाने (स्टॅन्ड अलोन, नॉन ॲसेन्शियल) दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.
मॉल बंद राहतील.
शनिवारी-रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकानेच सुरू राहतील.
कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील.
खाद्यपदार्थ, मद्य, ई-कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री ११ पर्यंत सुरू राहील.
माल वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्ट्स बंद राहील.
सर्व सरकारी कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.
ब्रेक द चेन अंतर्गत सुरू ठेवलेले निर्बंध कायम राहतील.
बॉक्स
दुपारी ३ नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी
सबळ कारणाशिवाय दुपारी ३ नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील. केवळ आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकच बाहेर निघू शकतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बॉक्स
पुढच्या आठवड्यात पुन्हा आढावा
पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल. यात निर्बंध शिथिल किंवा आणखी कडक करण्याबाबतचे निर्णय घेतले जातील. मात्र जनतेने बेसावध राहू नये. प्रशासनाने या काळात आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. आढावा बैठकीत लसीकरण, म्युकरमायकोसिस, ऑक्सिजन प्लांट, जनजागृती अभियान यावरही चर्चा करण्यात आली.