नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोकड असो अथवा कोणती किमती चिजवस्तू एकदा चोरीला गेली किंवा गहाळ झाली तर ती परत मिळणे कठीण मानले जाते. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या हरिवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या चीजवस्तू आणि रोकड शोधून परत करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांचा छडा लावून आरपीएफने रोख रक्कम आणि किंमती चिजवस्तू ज्यांच्या त्यांना परत केल्या.
दोन घटना नागपूर रेल्वे स्थानकावरच्या आहेत. आरपीएफला वेगवेगळ्या दोन बॅग आढळल्या. एका बॅगमध्ये डेल कंपनीचा ३५ हजार किंमतीचा लॅपटॉप होता आणि दुसऱ्या बॅगमध्ये टॅब, रोख रक्कम आणि अन्य चिजवस्तू असा एकूण १७,५०० रुपयांचा मुद्देमाल होता. आरपीएफने त्या दोन्ही बॅगमधील चिजवस्तूंवरून संबंधित व्यक्तींची ओळख पटविली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या चिजवस्तू परत केल्या. वर्धा रेल्वे स्थानकावर एका महिलेची पर्स गहाळ झाली. त्यात १५०० रुपये आणि मोबाईल होता. वर्धेवरून जाणाऱ्या एका ट्रेनमधून एका व्यक्तीची बॅग लंपास झाली. ज्यात १ लाख रुपये किमतीचा लॅपटॉप होता. या दोघांचीही आरपीएफने माहिती मिळवून त्यांना संपर्क केला आणि त्यांचे साहित्य त्यांना परत केले.
अशाच प्रकारे बैतुल स्थानकावरही एका प्रवाशाची पाच हजारांचे साहित्य असलेली बॅग शोधून आरपीएफने त्या व्यक्तीला ती परत केली. या सर्व घटनांमधील मुद्देमालाची किंमत एक लाख, ५८ हजार रुपये आहे.
प्रवासी झाले गदगद
चोरीला गेलेल्या, गहाळ झालेल्या किंमती चिजवस्तू आणि रोख रक्कम आरपीएफने परत मिळवून दिल्याने संबंधित प्रवाशी गदगद झाले आहेत. त्यांनी आरपीएफच्या कर्तव्यदक्षतेची प्रशंसा चालविली आहे.