नागपूर : लहान मुले काय खातील, काय गिळतील याचा नेम नाही. अनेकदा पालकांच्या दुर्लक्षाचा फटका चिमुकल्यांनाही बसतो. खेळता खेळता खिळा, सेल, नाणे, सेप्टी पीन गिळाल्याची गंभीर प्रकरणे समोर येतात. यांच्यासाठी मात्र, मेडिकलशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग वरदान ठरले आहे. विना शस्त्रक्रिया एण्डोस्कोपीच्या मदतीने यशस्वी उपचार केले जात आहेत.
-चार वर्षाच्या चिमुकल्याने गिळला सेल
बारी, यवतमाळ येथील ४ वर्षाच्या आनंद राठोड या चिमुकल्याने खेळत असताना संगणकाचा चपटा सेल गिळला. सुरुवातीला आई-वडील रागवतील या धाकाने आनंद गप्प बसला. नंतर पोटाचे दुखणे वाढल्याने त्याने आईला सांगितले. नातेवाईकांनी पुसद येथील रुग्णालयात दाखविले, तेथून यवमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविले. हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्राेलॉजी विभागाचे प्रमुख व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी शस्त्रक्रिया न करता ‘डबल बलून एन्डोस्कोप’च्या मदतीने सेल बाहेर काढला.
-तोंडात ठेवलेले पाच रुपयांचे नाणे गिळले
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील सहा वर्षीय शेख अरबाज शेख याने तोंडात ठेवलेले पाच रुपयांचे नाणे कधी गिळले, हे त्यालाही कळले नाही. गतिमंद असल्याने त्याला हा प्रकार आई-वडिलांनाही सांगताही आला नाही. पोटात नाणे असल्याने त्याचे पोट दुखत होते, उलट्या होत होत्या, परंतु उपचाराला यश मिळत नव्हते. यात चार महिने निघून गेले. अखेर अरबाजला ‘सुपर’च्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात दाखवण्यात आले. डॉ. गुप्ता यांनी एन्डोस्कोपीच्या मदतीने नाणे अलगद बाहेर काढले.
-चार महिन्यांपूर्वी गिळलेली पीन काढली बाहेर
चंद्रपूर जिल्ह्यातील खुंटवडा येथील सहा वर्षीय पायल संजय धारण या मुलीने केसांना लावायची पीन गिळली. आई-वडिलांनी तातडीने वरोरा येथील खासगी इस्पितळात नेले. डॉक्टरांनी औषधे दिली. परंतु पीन निघाली नाही. चार-पाच डॉक्टरांना दाखवूनही झाले. चार महिन्यापासून चिमुकली पोटाच्या असह्य वेदना सहन करीत होती. अखेर तिला नागपूरच्या ‘सुपर’मध्ये आणले. डॉ. गुप्ता यांनी अनुभवाच्या कौशल्यावर ‘एन्डोस्कोपी’च्या मदतीने पीन बाहेर काढली.
-गिळलेला खिळा अन्ननलिकेत फसला
खेळता खेळता सात वर्षीय मुलाने खिळा गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून नातेवाईकांनी अज्ञानातून केळी खाऊ घातली. मात्र, खिळा बाहेर येण्याऐवजी मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन फसला. मुलगा अस्वस्थ झाला. अखेर उपचारासाठी ‘सुपर’मध्ये आल्यानंतर डॉ. गुप्ता यांनी त्याला तपासले. खिळा अणुकुचीदार असल्याने तो बाहेर काढताना आतड्यांना इजा होण्याची जोखीम होती. त्यामुळे एन्डोस्कोपीच्या मदतीने आतड्यात फसलेला खिळा पोटापर्यंत आणून नंतर तो बाहेर काढण्यात आला.
-अशी घ्या काळजी
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांच्या हाती नाणी, पीन, खिळा किंवा इतरही वस्तू लागणार नाही, किंवा ती तोंडात टाकणार नाहीत, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. लहान मुलांनी काही गिळले असल्यास घरी उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांकडे घेऊन जायला हवे. अनेकवेळा केळी, ब्रेड, भात खाऊ घातला जातो. अशावेळी ती वस्तू आणखी आत जाते. यामुळे उपचाराची गुंतागुंत वाढून रुग्णालाही त्रासदायक ठरते.
-अत्याधुनिक दुर्बिणीचा वापर ()
पोटात गेलेली वस्तू बाहेर काढण्यासाठी पूर्वी शस्त्रक्रिया केली जायची. आता अनेक अद्ययावत यंत्र उपलब्ध झाल्याने शस्त्रक्रियेला पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु यासाठी अनुभव व कौशल्य असणे गरजेचे आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे एन्डोस्कोपीच्या मदतीने गिळलेल्या खिळ्यापासून ते नाण्यापर्यंतच्या वस्तू काढल्या आहेत. वर्षभरात साधारण असे सात ते आठ प्रकरण आढळून येतात.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल