नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माझ्या शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित असल्याचा विश्वास वाटला पाहिजे आणि पोलिसांवरील त्यांचा विश्वास वाढला पाहिजे. सोबतच गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली पाहिजे. यासाठी आपण स्पेशल ॲक्शन प्लॅन बनविला आहे. लवकरच त्याचे परिणाम नागपूरकरांना बघायला मिळेल, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी व्यक्त केला.
तीन महिन्यापूर्वी नागपुरात रुजू झालेल्या अमितेशकुमार यांनी शहरातील अट्टल गुन्हेगार, रेती माफिया, ड्रग माफिया, बुकी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करून ‘कुछ कर दिखाना है...’चा ट्रेलर दाखविला आहे. मात्र, शहरातील हत्यासत्र थांबायला तयार नाही. हुक्का पार्लर, मटका, सट्टा अड्डे, अवैध दारू, रेती, गांजा तसेच ड्रगची तस्करी सुरूच आहे. पोलिसांचा उर्मटपणाही वेळोवेळी चर्चेला येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी लोकमतने चर्चा केली. थेट प्रश्नांना थेट उत्तरे देत त्यांनी आपली कार्यशैली प्रामाणिक आणि पारदर्शी असल्याचे म्हटले. काम करताना चुका होतील. मात्र, चुका होण्याच्या भीतीने कामच करायचे नाही, हे आपल्याला पसंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलाखतीत झालेले सवाल-जवाब खालीलप्रमाणे आहेत.
गुन्हेगार निर्ढावले आहेत, शहरात हत्येची मालिका सुरू आहे. सगळं कसं थांबवणार?
नागपुरात हत्येचे प्रमाण जास्त आहे, हे मान्य. बाल्या बिनेकर हत्याकांडातून गुन्हेगारांच्या निर्ढावलेपणाचा प्रत्ययही आला आहे. मात्र, कर्तव्यकठोर कारवाई करून गुन्हेगारी ठेचून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मकोका, एमपीडीए, तडीपारीसारखे कायद्याचे शस्त्र उगारून गुन्हेगारांना अटकाव करण्याचे प्रयत्न केले जात आहे. गुन्हा घडूच नये, असे प्रयत्न आहेत. गुन्हा घडला तर जोपर्यंत त्याला शिक्षा सुनावली जाणार नाही, तोपर्यंत त्याला जामीन मिळू नये, यासाठी आवश्यक ती प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.
क्राईम रेट कमी अन् कन्विक्शन रेट कसा वाढवणार?
गुन्हेगाराला गब्बर बनविणारे सर्व अवैध धंदे बंद करून तसेच कायद्याचा चाबूक ओढून गुन्हेगारी मोडून काढायची आहे. दुसरीकडे प्रत्येक गुन्ह्यात सहभागी गुन्हेगारांच्या विरोधात तंत्रशुद्ध, भक्कम पुरावे गोळा करून त्याला शिक्षा सुनावली जाईल, यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
काय आहे टार्गेट?
अट्टल गुन्हेगार, ड्रग माफिया, बुकी, रेती तस्कर, मांस विक्री तसेच जनावरांची विक्री करणारे समाजकंटक आपले टार्गेट आहे. त्यांनी गैरकायदेशीर मार्ग सोडून द्यावा. चांगली कामधंदे करावीत, अन्यथा अत्यंत कडक कारवाईसाठी तयार राहावे.
ड्रगमाफियांचे नागपूर डेस्टीनेशन बनत आहे?
होय, नागपूरला ड्रग फ्री सिटी बनविण्यासाठी खूप काही करायचे आहे. ड्रग माफियांचे नेटवर्क मोडून काढायचे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दणकेबाज कारवाईतून त्याची सुरुवात झाली आहे.
पोलिसांभोवती घुटमळणाऱ्या दलालांचे कसे?
असे दलाल लक्षात यायला, थोडा उशीर लागतो. मात्र, एकदा तो अधोरेखित झाला की तो कुणीही असो, त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाईल.
पोलिसांच्या उर्मटपणाचे काय?
न्यायाच्या अपेक्षेने येणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून सन्मानजनक वागणूक मिळावी. तो त्यांचा हक्क आहे. तेच काय, वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीसोबतही सन्मानाने वागावे. वाहनचालकाच्या परिवारातील सदस्यासमोर त्याला अपमानजनक वाटेल, असे वागू बोलू नये, असे स्पष्ट निर्देश आपण दिले आहेत. आपली कैफियत घेऊन येणारे नागिरक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांनीही सन्मानाने वागावे, अशीच आपली भूमिका असून, शहर पोलीस दलात ते लवकरच बघायला मिळेल.
गृहमंत्र्यांच्या होम टाऊनमध्ये काम करण्याचे दडपण वाटते?
होय, नक्कीच. गृहमंत्र्यांच्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. त्यामुळे या शहरातील पुलिसिंग मॉडेल ठरावे, यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. त्यातूनच ‘प्रेशर टू परफॉर्मन्स’आहेच.