आशिष दुबे
नागपूर : कोरोना संक्रमण वाढत आहे. प्रशासन लॉकडाऊन लावत असताना दुसरीकडे महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र निष्काळजीपणा दाखवीत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी पाचपावली कोविड सेंटरमध्ये सुरक्षा आणि सुविधांचा अभाव आहे. प्यायचे पाणीही पुरेसे उपलब्ध नाही. परिणामत: रुग्ण लपून बाहेर चहा प्यायला जातात, जेवणात झुरळ निघतात. स्वच्छतेचा तर बोजवाराच उडाला आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा व सुविधा या दोघांचाही अभाव असल्याने येथील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेत नियुक्त असलेले एसआरपीच्या ६० पैकी २२ पॉझिटिव्ह आले होते. त्यांना गृह विलगीकरणात ठेवले होते. त्यातील १७ जण बाहेर फिरत होते. माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या पथकाने त्यांना पकडून पाचपावली कोविड सेंटरमध्ये पाठवले. त्यांतील काहीजण केंद्राच्या पहिल्या मजल्यावरून उड्या घेऊन चहा प्यायला बाहेर गेले होते. हे कळल्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांना आत आणले. त्यानंतर त्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. याची तक्रार महापालिकेचे अधिकारी व संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या केंद्राची क्षमता २४० आहे. केंद्रात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ४० होती, ती आता १५ वर आली आहे. एकही सुरक्षा गार्ड नाही. यामुळे नियंत्रण राखणे कठीण होत आहे. रुग्णांची देखभाल करणारे पाच कर्मचारीच संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या आता १० वर आली आहे.
...
अन्नाच्या सीलबंद पाकिटात निघतात झुरळ
येथे प्रचंड अव्यवस्था आहे. केंद्रातील रुग्णांना मिळणाऱ्या अन्नाच्या पाकिटात चक्क झुरळ निघतात. यामुळे अनेकांनी येथील जेवण घेण्यास नकार दिला आहे. रोज गोंधळ, गदारोळ सुरूच आहे. काही रुग्णांनी केंद्राबाहेर जाण्याचाही प्रयत्न केला आहे.
...
कोट
एसआरपी जवानांच्या वर्तणुकीबद्दल वरिष्ठांकडे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्या ज्यांना पकडून आणले आहे, तेच गोंधळ घालून आरोप लावत आहेत. जेवणात झुरळ निघाल्याचा आरोपही खोटा आहे. येथे सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही पुरवत आहोत. स्टफही पुरेसा आहे.
- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
...
मेडिकलमध्येही असुविधा
मेडिकल रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या कोविड वॉर्डातही प्रचंड असुविधा आणि दुरवस्था असल्याचा आरोप तेथील रुग्णांकडून होत आहे. रविवारी वॉर्डात वीज नव्हती. रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे ही तक्रार करूनही लक्षच दिले नाही. वाॅर्डातील रुग्णांना दररोज नवनव्या समस्यांना सामोरे जावे लागते, अशी तक्रार आहे.
...