नागपूर : भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात वडिलास जाळणाऱ्या मुलाला व त्याच्या मित्राला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच वर्षे सश्रम कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
रॉकी ऊर्फ चंद्रशेखर जिचकार (२८) असे मुलाचे तर, नितीन ऊर्फ नित्या उत्तम वाघाडे (२८) असे त्याच्या मित्राचे नाव आहे. मृताचे नाव राजेंद्र जिचकार होते. ते हुडकेश्वर भागात राहत होते. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी ॲड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ॲड. डागा यांनी प्रामुख्याने आरोपींचा खून करण्याचा उद्देश नव्हता, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला व आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ही सुधारित शिक्षा सुनावली. ही घटना ११ जानेवारी २०१७ रोजी घडली होती. आरोपींनी राजेंद्र यांच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.