लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर वडील व मुलगा तलावातील पाण्यात उतरले. ते गटांगळ्या खात असल्याचे पाहून आई व दुसरा मुलगा त्यांना वाचविण्यासाठी सरसावले. मात्र, नागरिकांना आई व दुसऱ्या मुलास वाचविण्यात यश आले. वडील व मुलगा तलावातील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेहगाव-झिल्पी शिवारात साेमवारी (दि. १७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
अब्दुल आफिक शेख (३५) व शहबील अब्दुल शेख (१२) अशी मृतांची नावे असून, अब्दुल असीफ शेख हे नागपूर शहरातील टिपू सुल्तान चाैक, संघर्षनगर येथे राहायचे. त्यांना शहबील आणि हुसनैन अशी दोन मुले होती. साेमवारी लहान मुलगा हुसनैन याचा वाढदिवस असल्याने ते दाेन्ही मुले व पत्नी आस्मा यांच्यासाेबत साेमवारी सकाळी हिंगणा तालुक्यातील माेहगाव-झिल्पी शिवारातील तलाव परिसरात फिरायला आले हाेते. त्यांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुलाचा वाढदिवस साजरा केला.
त्यानंतर अब्दुल आफिक शेख व शहबील तलावातील पाण्यात उतरले. आस्मा व दुसरा मुलगा हुसनैन काठावर हाेते. काही वेळातच दाेघेही गटांगळ्या खाऊ लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी आस्मा व हुसनैन सरसावले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आस्मा व हुसनैन याला कसेबसे पाण्याबाहेर काढून वाचविले. मात्र, अब्दुल व शहबील तलावातील गाळात फसल्याने त्यांना पाण्याबाहेर पडणे शक्य झाले नाही.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दाेघांचाही पाण्यात शाेध घेतला. दाेघांचाही बुडून मृत्यू झाल्याने काही वेळाने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शिवाय, ते उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
....
रमनीय व धाेकादायक तलाव
माेहगाव-झिल्पी शिवारातील या तलावाच्या परिसर अतिशय रमनीय असल्याने येथे फिरायला व पिकनिकला येणाऱ्यांची संख्या बरीच माेठी आहे. या तलावात आजवर अनेकांना बुडून मृत्यू झाला आहे. वर्षभरात या तलावात किमान पाच ते आठ जणांचा मृत्यू हाेत असल्याने या तलावात कुणीही अंघाेळ करण्यासाठी अथवा पाेहण्यासाठी उतरू नका, असे आवाहन करणारे सूचना फलक या तलावाच्या बाजूला लावण्यात आले आहेत. मात्र, कुणीही त्याकडे लक्ष देत नाही.