आॅनलाईन लोकमतनागपूर : बकरीचे पिलू घरी का आले, असे हटकल्याने झालेल्या भांडणातून खुनी हल्ला करून दोन भावंडांवर चाकूने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपी बापलेकास तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जालंधर महादेव झिंगारे (२४) आणि महादेव लक्ष्मण झिंगारे (५६) दोन्ही रा. तांडा, अशी आरोपींची नावे आहेत. मुकेश मारोती फटिंग (२६) आणि सुरेश मारोती फटिंग (३०) दोन्ही रा. तांडा, अशी घटनेच्या वेळी जखमी झालेल्यांची नावे होती.खुनी हल्ल्याची ही घटना १८ जून २०१५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती. जखमी फटिंग बंधू आणि झिंगारे पिता-पुत्र एकमेकांच्या शेजारी राहायचे. घटनेच्या दिवशी फटिंग बंधूंचे बकरीचे पिलू आरोपी झिंगारे यांच्या घरात शिरताच जालंधर आणि महादेव यांनी फटिंगच्या घरावर जाऊन त्यांच्याशी भांडण केले होते. मुकेशचा मोठा भाऊ सुरेश हा जन्मत:च मुका असूनही त्याने आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला होता तरीही आरोपी जुमानत नव्हते. अखेर भांडण विकोपाला जाऊन जालंधरने मूक सुरेशच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून जखमी केले होते. महादेवनेही सुरेशवर चाकूने वार केले होते. मुकेशने आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावरही वार केले होते. लागलीच गंभीर जखमी सुरेशला भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मुकेश फटिंग याच्या तक्रारीवरून अरोली पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरेश हा मुका असल्याने त्याचे मौखिक मृत्यूपूर्व बयान नोंदवून न घेता, त्याने हे बयान स्वत: लिहून दिले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर ३०७ कलमांतर्गतचा गुन्हा ३२४ कलमांतर्गत परिवर्तित करून आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड, तर आरोपींच्या वतीने अॅड. एस. एल. कोतवाल यांनी काम पाहिले.