लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नाईक तलाव परिसरातील एका जुगार अड्ड्यावर छापा मारून माजी उपमहापाैर तसेच नगरसेवक दीपराज पार्डीकर यांचा मुलगा जय याच्यासह १२ जुगाऱ्यांना जेरबंद केले. या कारवाईमुळे भाजप वर्तुळात सोमवारी चांगलीच खळबळ उडाली होती. बांगलादेश नाईक तलाव परिसरात गणपती बोकडेच्या घरी अनेक दिवसांपासून जुगार अड्डा भरतो. येथे मोठ्या संख्येत जुगारी जमतात, अशी माहिती मिळाल्याने पाचपावली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी तेथे छापा घातला. तत्पूर्वी, चारही बाजूंनी पोलिसांनी घेराबंदी केल्याने कोणत्याही जुगाऱ्याला पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी तेथून १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोकड अन् साहित्य जप्त केले.
विशेष म्हणजे, दीपराज पार्डीकर प्रभाग २० चे नगरसेवक असून त्यांची पत्नीही यापूर्वी नगरसेविका होती. त्यांचा मुलगा जय जुगार खेळताना पकडला गेल्याचे वृत्त पसरल्याने राजकीय वर्तुळात खासकरून भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. काहींनी प्रकरण जागच्या जागीच रफादफा करण्यासाठी फोनोफ्रेंडही केले. मात्र, सोशल मीडियावर जुगार अड्ड्यावर छापा पडल्याचे आणि पार्डीकर पुत्र पकडला गेल्याचे वृत्त जोरात व्हायरल झाल्याने ते शक्य झाले नाही.
----
अड्ड्यावर सापडलेले जुगारी
जय दीपराज पार्डीकर, गणपती बोकडे, ईश्वर गणपती बोकडे, योगेश रमेश कोहाड, धनंजय प्रभाकर गुरडे, पंकज वामनराव पराते, माणिक कुंदन बांगरे, संदीप महिपाल नंदनवार, विकास नागराज निमजे, नीतेश महादेव पाैनीकर, दर्शन विनोद हजारे आणि सोनू पांडुरंग परतेवाले.
----