नागपूर : ‘सबकुछ पैसा’ हेच अनेकांचे ब्रीदवाक्य असणाऱ्या काळात रक्ताच्या नात्यांमध्येदेखील द्वेष, विखार वाढत चालला आहे आणि याच्यातूनच अनेकदा गुन्हेदेखील घडताना दिसून येतात. नागपुरातील यशोधरानगरात रविवारचा दिवस थरकाप उडविणारा ठरला. बेरोजगार आरोपीला स्वत:च्या आईपेक्षा नशा देणारी दारू जास्त महत्त्वाची वाटली आणि पैसे न दिल्याने संतापून त्याने जन्मदात्रीवरच विळ्याने वार केले. अक्षरश: राक्षसी कृत्य करत त्याने आईचाच गळा चिरत तिचा खून केला.
गोविंद संतराम काटेकर (४८, वनदेवीनगर) असे आरोपीचे नाव असून विमलाबाई संतराम काटेकर (६०) असे दुर्दैवी मृत मातेचे नाव आहे. आरोपी गोविंदला दारूचे व्यसन असून त्याच्या या सवयीमुळे कुणीही त्याला जास्त दिवस कामावर ठेवत नाही. काही वेळा मजुरी म्हणून तो कामदेखील करतो. कुटुंबात आईशिवाय मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ सुमारे दहा वर्षांपासून पत्नी व मुलांसह कळमना येथे राहतो. दारूच्या व्यसनामुळे गोविंदला काही दिवस काम मिळत नव्हते. तो आई विमलाबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. पैसे न दिल्याने गोविंद त्याच्या आईलाही मारहाण करायचा.
रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदने विमलाबाईंकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुरुवातीला आईने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. गोविंदकडून सतत छळ होत असल्याने त्यांनी घरच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गोविंदच्या तळपायाची आग मस्तकात गेली व त्याने घरातील विळा घेत आईकडे धाव घेतली. त्याने विळ्याने आईचा गळा चिरला. यात विमलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व आचके देत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नशा उतरल्यावर पोहोचला पोलिस ठाण्यात
आईची हत्या केल्यावर गोविंद थोड्यावेळाने घराबाहेर निघाला. दारूच्या नशेत तो दिवसभर भटकला. सायंकाळी पाचच्या सुमारास नशा उतरल्यावर त्याला नेमके काय करून ठेवले हे लक्षात आले. त्याने स्वत:च यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना त्याने खून केल्याचे सांगितले. एकूण प्रकार ऐकल्यावर त्यांनादेखील धक्काच बसला. त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गोविंदविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
अनेक दिवसांपासून देत होता त्रास
गोविंदच्या दारूच्या व्यसनामुळे त्याला कोणी नियमित कामही देत नव्हते. त्याच्या वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते व तेव्हापासून त्याने आईला त्रास देणे सुरू केले होते. पैशांसाठी तो सातत्याने विमलाबाईंना छळायचा. शेजारच्यांनादेखील हा प्रकार माहिती होता व अनेकांनी त्याची समजूत घालण्याचादेखील प्रयत्न केला होता.