११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर सभा : अशोक चव्हाण यांच्या आज मॅराथॉन बैठकानागपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा सांगता समारंभ ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वरूप दिले असून काँग्रेसचे देशभरातील दीडशेवर व्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. अ.भा. काँग्रेस समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महु, नांदेड व औरंगाबाद येथे कार्यक्रम घेण्यात आले. आता ११ एप्रिल रोजी नागपुरात समारोपीय सोहळा होत आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेला मोर्चा यशस्वी झाल्यानंतर आता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयारी चालविली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दोन आठवड्यांपूर्वी नागपुरात विदर्भातील नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. आता चव्हाण पुन्हा शुक्रवारी, १ एप्रिल रोजी बैठकांचे सत्र घेणार आहेत. चव्हाण यांचे गुरुवारी रात्री नागपुरात आगमन झाले. रात्रीही त्यांनी स्थानिक नेत्यांकडून तयारीची माहिती घेतली. प्राप्त माहितीनुसार खा. चव्हाण हे चार बैठका घेतील. पहिली बैठक शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे विधानसभेतील उमेदवार, माजी खासदार, माजी मंत्री यांची होईल. नागपुरात सभा होत असल्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्यालाच गर्दी जमविण्याची मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. काँग्रेसच्या विविध आघाड्यांच्या राज्यभरातील प्रमुखांची दुसरी बैठक होईल. त्यानंतर राज्यभरातील आजी- माजी मंत्री, आमदार, खासदार यांची तिसरी बैठक होईल. काँग्रेसने सभेच्या तयारीसाठी जिल्हानिहाय निरीक्षक नेमले होते. या निरीक्षकांनी जिल्हास्तरावर जाऊन सभेच्या तयारीसाठी बैठका घेतल्या. चौथी बैठक या निरीक्षकांची होईल. तीत निरीक्षक तयारीचा अहवाल सादर करतील. चारही बैठकांच्या आढाव्यानंतर सभेला किती गर्दी होईल, याचा अंदाज काँग्रेसला येईल. (प्रतिनिधी)
सोनिया गांधींच्या सभेसाठी काँग्रेसचे दीडशेंवर ‘व्हीआयपी’
By admin | Published: April 01, 2016 3:18 AM