डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वी जयंती सोहळा : एप्रिलचा दुसरा आठवडा निश्चितनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात भव्य समारोपीय सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी चालविली आहे. ९ ते १४ एप्रिल दरम्यानची कुठलीही एक तारीख या सोहळ्यासाठी निश्चित केली जाईल. सोहळा दीक्षाभूमीवर घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस आहे. मात्र, दीक्षाभूमी स्मारक समितीकडून त्याची परवानगी न मिळाल्यास कस्तूरचंद पार्कचा विचार केला जाईल. या सोहळ्याच्या आखणीसाठी दिल्लीत १६ मार्च रोेजी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीनंतर १९ किंवा २० मार्च रोजी नागपुरात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होईल. १९ रोजी प्रदेश काँग्रेसची बैठकनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५वा जयंती सोहळा साजरा करण्यासाठी नागपुरात १९ किंवा २० मार्च रोजी आयोजित काँग्रेसच्या बैठकीला अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी खा. विलास मुत्तेमवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, विदर्भातील आजी माजी आमदार, खासदार, मंत्री व पदाधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत कार्यक्रमाची अंतिम रूपरेषा निश्चित होईल.राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शुभारंभप्रसंगी कस्तूरचंद पार्कवर सोनिया गांधी यांच्या सभेला अलोट गर्दी जमली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्व नागपुरातील सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नागपुरात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमालाही तशीच गर्दी व्हावी, याचे नियोजन काँग्रेसतर्फे केले जात आहे. याबाबत प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा सोहळा नागपुरात होणार असल्याचे सांगत अद्याप तारीख, वेळ व नेमके कोण उपस्थित राहणार, हे निश्चित झाले नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सोनिया, राहुल गांधी एप्रिलमध्ये नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 3:07 AM