नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात व्यापाऱ्याला अडकवून ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनच्या प्राप्तिकर विवरणाच्या तपशिलाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. आठ वर्षांत कागदोपत्री त्याची मिळकत केवळ ८३ लाखांची होती, तर मागील आर्थिक वर्षात त्याने १६ लाख कमाविले. मात्र, प्रत्यक्षात त्याच्याकडे १८० कोटींहून अधिकचे घबाड आहे. या आकडेवारीतून सोंटू करत असलेला गोलमाल समोर आला असून पोलिसांकडून आणखी सखोल तपास सुरू आहे.
सोंटू पोलिसांच्या चौकशीत उडवाउडवीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देत आहे. त्याने त्याचा मोबाइल किंवा लॅपटॉपदेखील पोलिसांना तपासणीसाठी दिलेला नाही. सोंटूने पोलिस आणि न्यायालयासमोर जबाबदार व्यावसायिक असल्याचा दावा केला होता. पोलिसांनी एप्रिल २०१४ ते मार्च २०२३ या कालावधीतील प्राप्तिकर विवरणपत्रांचे तपशील मिळवले आहेत. यामध्ये सोंटूने ८ वर्षांच्या कालावधीत ८३.५० लाख रुपयांची कमाई केली आहे. २०२२-२३ मध्ये त्याची कमाई १६ लाख १५ हजार ६४० रुपये होती.
पोलिसांनी सोंटूच्या घरातून आणि बँक लॉकरमधून ३२ कोटी रुपये रोख आणि सोने जप्त केले आहे. त्याच्या २० हून अधिक स्थावर मालमत्ता आढळून आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांनुसार या मालमत्तेचा सध्याचा बाजारभाव १५० कोटी रुपये आहे. सुमारे १८० कोटींहून अधिकची जंगम आणि जंगम मालमत्ता असलेल्या सोंटूने चालू वर्षात केवळ १६ लाखांची कमाई कागदोपत्री दाखविल्याने त्याची चलाखी समोर आली आहे. सोंटूचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये सोंटूविरोधात सबळ पुरावे सादर करण्यात आले आहेत.
माजी आमदाराच्या मुलाकडून मदत
गोंदियाच्या माजी आमदाराचा मुलाकडून सोंटूला मदत करण्यात येत आहे. तो सोंटूचा जुना मित्र आहे. त्याच्या सांगण्यावरून शहरातील एका नेत्यानेही पोलिसांशी संपर्क साधला. माजी आमदाराच्या मुलाने नागपूर-मुंबईतील अनेक नेते आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
३० कोटींचा सौदा
काही काळापूर्वी सोंटूने गोंदिया येथील संजय अग्रवाल यांच्यासोबत जमिनीचा मोठा सौदा केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अग्रवाल यांना जवळपास ३० कोटी रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. उर्वरित रक्कम भरण्यासाठीच त्याने घरात रोकड ठेवली होती. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी धाड टाकली होती.