नागपूर : नागपुरात शनिवारी ढग निवळले आणि दोन दिवसापूर्वीचे वातावरण बदलले. खालावलेले तापमान २४ तासात ५.४ अंश सेल्सिअसने वाढून ३०.६ अंशावर पोहचले. विदर्भात वाशिम सर्वात थंड राहिला. तेथील तापमानाचा पारा १४.२ खाली घसरला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ढग निवळल्यावर वातावरण कोरडे होत जाईल, तसतसा पारा घसरत राहील. मागील २४ तासामध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्हा वगळता, अन्य सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये १ अंश ते ६.६ अंशाने वाढ झाली. वातावरण स्वच्छ झाले, रात्रीच्या तापमानातही घट होताना दिसत आहे. नागपुरातील किमान तापमानात मागील २४ तासामध्ये २.९ अंश सेल्सिअसने घट झाली. मागील तीन दिवसात तापमान वेगाने कमी-अधिक होताना जाणवत आहे.
या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी प्रकृतीच्या तक्रारी केल्या असल्या तरी ही गंभीर बाब नाही. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६८ टक्के होती, तर सायंकाळी त्यात घट होऊन ४२ वर आल्याची नोंद झाली आहे.